24 तासात 63 हजार 490 नवे पॉझिटिव्ह : 944 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. रविवारी कोरोना बाधितांची संख्या 26 लाखांच्या जवळ पोहचली. मागील 24 तासात कोरोनाचे 63 हजार 490 नवे रुग्ण सापडल्याने आतापर्यंतचा एकूण आकडा 25 लाख 89 हजार 682 झाला आहे. तसेच दिवसभरात देशात 944 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा देशातील बळींचा आकडा 50 हजारांजवळ पोहोचत आला आहे.
कोरोनाचे शनिवारी देशात नवे 65,002 रुग्ण आढळले होते. तसेच 996 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात रविवारी आणखी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे 6 लाख 77 हजार 444 सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, आतापर्यंत 18 लाख 62 हजार 258 लोक बरे झाले आहेत. रविवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात 53 हजार 322 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
मृत्यूच्या प्रमाणात घट
देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 49,980 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वात कमी मृत्यू झालेल्या देशांपैकी भारत एक आहे. मृत्यूची संख्या 50,000 ओलांडण्यासाठी अमेरिकेत 23 दिवस, ब्राझीलमध्ये 95 दिवस आणि मेक्सिकोमध्ये 141 दिवस लागले. मात्र भारतात मृतांचा आकडा 50 हजार होण्यासाठी 157 दिवस लागणार आहेत. एकंदर योग्य आरोग्य उपचारांमुळे भारतात इतर देशांच्या तुलनेत चांगली स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.









