चोवीस तासात 46,232 नवे पॉझिटिव्ह, 564 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वेग आलेला दिसत आहे. बऱयाच राज्यांत कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 91 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 46 हजार 232 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 564 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे देशातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 लाख 50 हजार 598 पर्यंत पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 84 लाख 78 हजार 124 लोक बरे झाले आहेत, तर सध्या देशात 4 लाख 39 हजार 747 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 564 लोकांच्या झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या 1 लाख 32 हजार 726 वर गेली आहे. दिल्लीतील कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्याचे प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत आहेत. देशाच्या राजधानीत दररोज कोरोनाचे नवे आकडे वाढत आहेत. परिस्थिती अशी आहे की, दिल्लीच्या संसर्गाचा परिणाम आता एनसीआर भागातही होऊ लागला आहे. नोएडा आणि गुरुग्राम सीमेवर रँडम चाचणी घेण्यात येत आहे. दररोज, कोरोनाचे नवीन आकडे दहशत निर्माण करत आहेत.
दिल्लीत रुग्णसंख्येत मोठी वाढ
दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजार 159 वर पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत, 24 तासात दिल्लीत कोरोनामुळे 118 लोकांचा मृत्यू झाला, तर 6,608 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 5.17 लाखांहून अधिक झाली आहे. दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे एनसीआरमध्ये पुन्हा साथीचा रोग होण्याची शक्मयता आहे. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या नोएडामध्ये कोरोनाची 1,400 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत नोएडामध्ये कोरोनाचे 21,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर 74 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील कोरोनाचा वाढता जीवघेणा परिणाम पाहून त्यातून बचावाचे मार्ग शोधले जात आहेत. त्याचबरोबर, उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये आयसीयू व इतर सुविधांवर काम सुरू आहे. दिल्लीत कोरोनाची प्रकरणे केवळ वाढतच नाहीत तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्याही विक्रम मोडत आहे. याच कारणास्तव दिल्लीच्या स्मशानभूमींमध्ये मृतदेह जाळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
दिल्लीतील संसर्गामुळे इतर राज्ये सतर्क
हरियाणा सरकारने दिल्लीच्या सीमेवरील शहरांमध्ये आणि सीमेवर चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्राममध्ये प्रवेश करणाऱया वाहनांच्या चालकांकडून टोलनाक्यावर कोविड चाचणी घेण्यात येत आहे. दिल्लीच्या कोरोना संसर्गापासून होणाऱया नव्या संसर्गापासून बचाव करण्याचा विचार केला जात आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार मुंबई ते दिल्ली दरम्यान रेल्वे आणि हवाई सेवा थांबविण्याची तयारी करत आहे. मुंबईतील बीएमसीने डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यप्रदेशात कोरोनाची 1,528 नवीन प्रकरणे
मध्यप्रदेशात शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,528 नवीन प्रकरणे नोंदली गेली. यासह राज्यात आतापर्यंत या विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या वाढून 1 लाख 89 हजार 546 झाली आहे. या आजारामुळे राज्यात गेल्या 24 तासात आणखी नऊ मृत्यूची नोंद झाली असून, मृतांचा आकडा 13 हजार 188 वर पोहोचला आहे. झारखंडमध्ये संक्रमणाचे 185 नवीन रुग्ण सापडले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये 1,686 नवे रुग्ण सापडले असून 18 मृत्यूंची नोंद झाली आहे.









