ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोना रुग्णांवर संशोधन करण्यासाठी देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या शवविच्छेदन अहवालातून संशोधनासाठी महत्वाची माहिती समोर येणार आहे.
भोपाळच्या AIIMS ने या शवविच्छेदनासाठी ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ची परवानगी घेतली होती. या परवानगीनंतरच डॉक्टरांच्या एका टीमने पीपीई किटसह सुरक्षितरित्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. आणखी काही मृतदेहांचे शवविच्छेदन करून त्याचा एकत्रित अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे.
मृत शरीरात कोरोना विषाणू किती काळ जिवंत राहतो, शरीरातील अवयवांना तो कशा प्रकारे हानी पोचवतो, तसेच त्याचा शरीरात किती प्रभाव राहू शकतो, यासारखी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.









