भारतीय अर्थव्यवस्थेत मोठय़ा घसरणीचा अंदाज
मुंबई / वृत्तसंस्था
कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यापासून देशाच्या एकंदर उत्पन्नात मोठी घसरण झाली होती. आता ‘अनलॉक’नंतर अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही महिन्यांचा अवधी जावा लागेल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. तसेच देशातील जीडीपी कमी होण्याबाबत इशारा देत पहिल्यांदाच देश अशा तांत्रिक मंदीच्या भोवऱयात सापडल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या धोक्यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र सरकारने देशभरात ‘लॉकडाऊन’ केल्यामुळे आधीच मंदीच्या टप्प्यातून जाणारी भारतीय अर्थव्यवस्था विनाशकारी बनली आहे. आता ‘अनलॉक’ सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू सुधारताना दिसत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्मयांनी घट होईल. गेल्या सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपी घसरत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचे वातावरण पसरले आहे. पहिल्या तिमाहीत कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या परिणामामुळे उत्पादनात 23.9 टक्क्यांपर्यंत घट नोंद झाली होती.
आरबीआय अंदाजानुसार जीडीपीत 8.6 टक्के घट
दुसऱया तिमाहीच्या जीडीपीचे अधिकृत आकडे अजूनही आलेले नाहीत. मात्र, सद्यस्थितीनुसार सप्टेंबरच्या तिमाहीत 8.6 टक्क्मयांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आरबीआयने वर्तविला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आरबीआयच्या मासिक बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.5 टक्क्मयांनी कमी होईल, असा अंदाज आरबीआयने यापूर्वीच वर्तवला आहे.