ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात 1553 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 265 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 543 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 36 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 2547 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, रुग्ण दुप्पट होण्याची टक्केवारीत घसरण झाली असून 18 राज्यांमधील रुग्ण वाढण्याची टक्केवारी देखील कमी झाली आहे. ओडिशा आणि केरळमध्ये परिस्थिती सुधारत आहे. तर एकूण 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या चौदा दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.
आम्हांला पश्चिम बंगाल मधून एक आर टी-पीसीआर किट बद्दल तक्रार आली होती. समूहाच्या चाचणीसाठी रॅपिड टेस्ट आहे. एका व्यक्तीसाठी त्याचा उपयोग नाही होऊ शकत अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली.
राज्यामध्ये लॉक डाऊन चे पालन अधिक कठोरपणे केले जावे यासाठी केंद्राकडून प्रत्येक राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी लॉक डाऊन चे उल्लंघन केले जात नाही आहे त्या राज्यांमध्ये केंद्राची पथके रवाना झाली आहेत. जे लॉक डाऊन चे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. तसेच पुणे, मुंबईतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पथके केंद्राची पथके तयार आहेत. केंद्राची पथके हॉस्पिटल मधील परिस्थितीचा आढावा घेतील, असं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.