ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 74 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे देशात आत्तापर्यंत एकूण 11 हजार 706 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्य स्थितीत हे प्रणाम 27.52 टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 42 हजार 533 पोहचली असून आत्तापर्यंत 1 हजार 373 जणांनी आपला जीव गमावला आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. रेल्वेसेवा, विमान सेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. मात्र मेडिकल इमर्जन्सी आल्यास यामध्ये सूट दिली गेली आहे. तसेच जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा काही ग्रामीण भागांमध्ये दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
देशात कोरोनामुक्त रुग्णाचे प्रमाण वाढत असले तरी अजून ही धोका टळला नाही आहे. त्यामुळे सरकार द्वारे देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग देखील जरुरी असून सर्वांना घरीच थांबण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.









