ब्रिटन, तुर्कस्थान, युरोपीय संघातील विमानसेवा स्थगित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 120 वर पोहोचली आहे. पूर्वेकडील राज्यांपैकी ओडिशाने सोमवारी पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण नोंदवला. तसेच लडाख, जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी एक नवीन प्रकरण नोंदविण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील रुग्णसंख्याही वाढून 38 वर पोहोचली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत देशातील एकूण रुग्णसंख्या 120 वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
सावधगिरीचा उपाय म्हणून भारताने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच वैद्यकीय सावधगिरी बाळगण्याबरोबरच रुग्णांची देखभाल करण्यावरही भर देण्यात येत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता काही देशांशी हवाई संपर्क बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यानुसार ब्रिटन, तुर्कस्थान आणि युरोपीय संघातील देशांमधील आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे बंद ठेवण्याचा पवित्रा सोमवारी जाहीर करण्यात आला.

एप्रिल महिन्यात औषधाची चाचणी शक्य
कोरोना व्हायरसवर औषध तयार केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात चीन या औषधाची वैद्यकीय चाचणी करण्याची शक्मयता आहे. चीनमधून सुरु झालेल्या या महामारीवरील औषधाचा अनेक देशांकडून शोध सुरु आहे. पण चीनने या संसर्गावरील औषध शोधण्यात आघाडी घेतल्याचा दावा केला असून लवकरच चाचणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, औषधाच्या चाचणीनंतरही ते बाजारात येण्यास किती वेळ लागेल याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचना
- गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो पूर्णपणे टाळा.
- खोकला-ताप असल्यास इतरांशी संपर्क साधू नका.
- हात न धुता डोळे, तोंड, नाकाला स्पर्श करू नका.
- कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुळीच थुंकू नका.
- ताप-खोकला असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
- डॉक्टरकडे जाताना मास्कचा अवश्य वापर करा
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा.
- वापरून खराब झालेले मास्क उघडय़ावर टाकू नका.









