नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात मागील २४ तासांत ३० हजार ७७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारच्या तुलनेत जवळपास १३.७ टक्क्यांनी रुग्णसंख्या कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ९४५ रुग्ण बरे झाले असून ३०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट २.४ टक्के झाला असून गेल्या ८६ दिवसांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्हीटी रेट १.९७ टक्के असून गेल्या २० दिवासंच्या तुलनेत तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
देशात सध्या ३ लाख ३२ हजार १५८ सक्रिय रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख ४८ हजार १६३ वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ७१ हजार १६७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून ४ लाख ४४ हजार ८३८ जणांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासात ८५ लाख ४२ हजार ७३२ जणांचं लसीकरण झालं असून आतापर्यंत ८० कोटी ४३ लाख ७२ हजार ३३१ जणांनी लस घेतली आहे.