बरे होण्याचे प्रमाण 49 टक्क्यांच्या जवळ, बाधितसंख्याही वाढली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या चाचण्यांची संख्या आता देशात 40 लाखांहून अधिक झाली आहे. एकंदर 42 लाख 40 हजार 391 चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 1 लाख 37 हजार 158 चाचण्या बुधवारी एका दिवसात झाल्या आहेत. सध्या देशात कोरोनाबाधितांची एकंदर संख्या 2 लाख 7 हजार 615 इतकी आहे.
मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या 24 तासांमध्ये देशात नव्या 8 हजार 909 बाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत 217 जणांचा मृत्यू झाला असून 4 हजार 776 जण बरे झाले आहेत. मृतांची एकंदर 5 हजार 815 झाली आहे. बरे झालेले एकंदर रूग्ण आता 1 लाख 3 हजार 3 इतके असून हे प्रमाण 48.31 टक्के आहे. रूग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत अद्यापही महाराष्ट्र आघाडीवर असून तेथे रूग्णसंख्या 72 हजारांहून अधिक झाली आहे. देशात मृत्यूदर 2.80 टक्के असून ते जागतिक सरासरीच्या बरेच कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने पत्रकार परिषदेत दिली.









