नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाटय़ाने होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात देशात कोरोनाचे 45 हजार 720 नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही आतापर्यंतची एका दिवसातील उच्चांकी वाढ ठरली आहे. बाधितांमध्ये मोठी वाढ होण्याबरोबरच मृतांचा दिवसभरातील आकडाही जवळपास दुपटीने वाढला आहे. गुरुवारी दिवसभरात 1 हजार 129 जणांचा मृत्यू झाल्याने देशातील एकूण मृतांचा आकडा 29 हजार 861 इतका झाला आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा गुरुवारी 12 लाखांच्या पुढे पोहोचला. दररोज 30 ते 40 हजारांमध्ये वाढणाऱया रुग्णसंख्येने गुरुवारी अचानक 45 हजारांचा टप्पा ओलांडला. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 38 हजार 635 एवढी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 82 हजार 607 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 4 लाख 26 हजार 167 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी एका दिवसात तब्बल 29 हजार 557 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 63 टक्क्मयांवर पोहोचले असून ते दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजे 84.83 टक्के इतके आहे. देशातील 19 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,576 नवे रुग्ण आढळले असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 5,552 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे झालेली आहे. तामिळनाडूत 5,849, दिल्लीत 1,227, कर्नाटकात 4,764, आंध्रप्रदेशमध्ये 6,045, उत्तर प्रदेशात 2,300 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
चोवीस तासात तामिळनाडूत सर्वाधिक बळी
दिवसभरात सर्वाधिक दगावणाऱयांमध्ये तामिळनाडू राज्य आघाडीवर राहिले आहे. तेथे 518 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच महाराष्ट्रात 280, दिल्ली 29, कर्नाटक 55, आंध्रप्रदेश 65, उत्तर प्रदेश 34, गुजरात 28, पश्चिम बंगाल 39 इतक्या मृतांची नोंद गेल्या चोवीस तासात झालेली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 12,556 जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल दिल्ली (3,719), तामिळनाडू (3,144), गुजरात (2,224) या राज्यांचा क्रमांक लागतो.









