12 दिवसात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये आठपट वाढ : राजस्थानमध्ये सापडले दिवसात 23 संक्रमित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या देशावर कोरोनाचे तसेच ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. आतापर्यंत देशभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचे 828 रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचारानंतर 241 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांपैकी सर्वाधिक 238 रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत, तर महाराष्ट्रात 167 आणि गुजरातमध्ये 78 रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या 12 दिवसांत ओमिक्रॉन संसर्ग देशात आठपट वाढला आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे वाढत्या धोक्मयाबरोबर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
ओमिक्रॉन प्रकरणांच्या बाबतीत राजस्थान आता देशात चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये बुधवारी ओमिक्रॉनचे 23 नवीन रुग्ण आढळून आले. आता राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 69 झाली आहे. आता नवीन प्रकार राजस्थानच्या 7 शहरांमध्ये पसरला आहे. जयपूर, सीकर, अजमेर आणि उदयपूरमध्ये आधीच रुग्ण होते. राजस्थानच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अजमेरमध्ये 10, जयपूरमध्ये 9, भिलवाडामध्ये 2 आणि अलवर, जोधपूरमध्ये प्रत्येकी एक ओमिक्रॉनची प्रकरणे आढळून आली आहेत.









