ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. भारतातील आठ राज्यात या व्हेरिएंंटचा शिरकाव झाला असून, आज नव्याने आढळलेल्या 4 प्रकरणांसह देशातील ओमायक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या 37 वर पोहचली आहे.
देशात आज चंदीगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या प्रत्येकी एका रुग्णाची पुष्टी झाली आहे. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे हा रुग्ण सापडला असून तो नुकताच आयर्लंडहून मुंबईमार्गे येथे आला हेता. चंदीगडमध्ये आढळलेला रुग्ण इटलीहून आला आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतील एक 34 वर्षीय तरुण ओमायक्रॉन संक्रमित आढळला. तर नागपूरमधील एका 40 वर्षीय व्यक्तीमध्ये ओमायक्रॉनची पुष्टी झाली आहे.
दरम्यान, आतापर्यंत देशात ओमायक्रॉन बाधित 37 रुग्ण आढळले असून, सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचा संसर्ग झालेले 18 रुग्ण आहेत. त्यानंतर राजस्थानमध्ये 9, कर्नाटकात 3, गुजरातमध्ये 3, दिल्लीत 2, आंध्रप्रदेश आणि चंदीगढमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.









