ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आठ नव्या बँकांनी लायसन्ससाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या सार्वत्रिक बँकांसाठी चार आणि लघु वित्त बँकांसाठी चार अर्ज आले आहेत. या बँकांना लायसन्सबाबत 1 ऑगस्ट, 2016 आणि 5 डिसेंबर 2019 रोजी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.
युनिव्हर्सल बँकांमध्ये युएई एक्सचेंज अँड फायनान्शयिल सर्व्हिसेस, द प्रिटिटियर्स कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक लि, चैतन्य इंडियन फिन पेडिट प्रायव्हेट लिमिटेड आणि पंकज वैश्य यांनी युनिव्हर्सल बँकेच्या लायसन्ससाठी ‘ऑन टॅप’ लायसन्स मार्गदर्शकाखाली अर्ज केले आहेत.
तर लघु वित्त बँकांमध्ये ‘ऑन टॅप’ मार्गदर्शक सूचनांनुसार, व्हिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कॅलिकट सिटी सर्व्हिस कोऑपरेटिव्ह बँक लि, अखिल कुमार गुप्ता आणि प्रादेशिक ग्रामीण फायनशील सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्ज केला आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार युनिव्हर्सल बँकेसाठी किमान पेड वोटिंग इक्विटी कॅपिटल 500 कोटी रुपये तर एसएफबीच्या बाबतीत किमान पेड-अप वोटिंग कॅपिटल 200 कोटी रुपये असावे.









