फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन प्रकल्पात होतेय निर्मिती – जगभरामध्ये विक्री होत आहे मेड इन इंडिया फोन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन टेक कंपनी ऍपलने भारतीय प्रकल्पामध्ये आपल्या फ्लॅगशिप मॉडेल आयफोन 13 चे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार कंपनीने चेन्नई येथील फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये सदरच्या मॉडेलचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे. ऍपल सेमिकंडक्टर चिप खरेदी करण्यात यशस्वी झाला आहे. चिप पुरवठा हा जगभरातच कमी असल्याने अनेक कंपन्या प्रभावीत झाल्या असल्याचे आपण मागील काही दिवसांपासून पहात आलो आहोत. यामध्येही कंपनीचा हा प्रवास सुरु असल्याची बाब सकारात्मक मानली जात आहे.
ऍपल फेब्रुवारीपर्यंत भारतात आयफोन 13चे व्यावसायिक उत्पादन घेण्यास प्रारंभ करणार असून कंपनी आगामी काळात सर्व मॉडेल्सचे उत्पादन घेणार असल्याचे ध्येय निश्चित केले आहे. ज्याची सर्वाधिक मागणीतील मॉडेलच्या निर्मितीवर अधिक भर देणार असल्याचे संकेत आहेत. सध्या भारतात तयार होणाऱया आयफोन 13 ची जवळपास 20 ते 30 टक्के निर्यात केली जाते. आगामी काळातही भारतामध्ये उत्पादन वाढविण्यासोबत जागतिक बाजारात आपली उपकरणे पुरवठा करणार असल्याची माहिती आहे.
चेन्नई व बेंगळूरमध्ये आयफोनची निर्मिती
भारतामध्ये आयफोनचे उत्पादन सुरु होण्यासोबत पुरवठय़ामध्येही असणारी कमतरता दूर केली जाणार आहे. साधारणपणे आयफोन 11 आणि आयफोन 12 भारतात सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे.
देशात आयफोन 13 आवृत्तीला मागणी वाढली
आयफोन 13 आवृत्तीला सप्टेंबरमध्ये भारतात सादर केले होते. आयफोन 13 प्रो आणि 13 प्रो मॅक्स देशामध्ये सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. यासह ऍपलने भारतामध्ये आयफोन 13 चे उत्पादन करण्याची योजना मजबूत आखली असून भारतीय ग्राहक 70 टक्के मेड इन इंडियाच्या आयफोनचा वापर करतील, असे सांगितले जाते.









