कोरोना संकट, लॉकडाऊनच्या प्रवासातील एक वर्ष- फेब्रुवारी 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 6.9 टक्क्यांवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील वर्षांपासून घोंगावत असणारे कोरोना विषाणूचे संकट आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी लूग करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला आज 25 मार्च रोजी वर्षपूर्ती होत आहे. परंतु कोरोना संकट कमी होण्याचे काही नाव घेत नाही. या बंदचा नकारात्मक परिणाम म्हणून एक वर्षांनंतरही भारतामधील रोजगाराची समस्या पूर्णपणे कमी झाली नसल्याचे समोर आले आहे.
शासनाकडून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी बंदची घोषणा केली होती, परंतु याचा फटका हा आर्थिक, वाणिज्य प्रवासाला बसला असून यामुळे विविध क्षेत्रात काम करणारे लोक, स्थलांतरीत कामगार यांच्या जीवनावर मोठा नकारात्मक परिणाम झाल्याने कितीतरी लोक बेरोजगार झाल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) यांच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2021 मध्ये बेरोजगारीचा दर हा 6.9 टक्क्यांवर राहिला असून जो मागच्या वर्षातील समान महिन्यात 7.8 टक्के आणि मार्च 2020 मध्ये 8.8 टक्के होता. एप्रिलमधील बेरोजगारीचा दर 23.5 टक्क्यांच्या घरात पोहोचला होता. तसेच मे महिन्यात हा आकडा 21.7 टक्के नोंदवला होता. यानंतर जूनमध्ये काहीसा दिलासा मिळत हा टक्का 10.2 टक्के आणि जुलैमध्ये 7.4 टक्क्यांवर राहिल्याची माहिती आहे.
आत्मनिर्भरचा लाभ
आत्मनिर्भरच्या घोषणेमुळे देशात नवीन रोजगार निर्मिती करणाऱयांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीतून जवळपास 16.5 टक्के लोकांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ उठविल्याचे दिसून आले आहे.
शहरी, औद्योगिक क्षेत्रात सुधारणा
बेरोजगारीचा दर काहीसा कमी करण्यासाठी शहरातील औद्योगिक क्षेत्रात सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचे सीएमआयईने आपल्या अहवालातून सांगितले आहे. पुननिर्माण आणि सेवा क्षेत्रातील सुधारणांसह कृषी क्षेत्रातील कामगिरी मजबूत राहिल्याने शहरासह औद्योगिक क्षेत्रात सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱया काळात या क्षेत्रांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत.









