ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे काही राज्यांकडून सांगण्यात येते. मात्र, देशात अद्याप सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य विभागाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी दिले आहे.
भूषण म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने सामूहिक संसर्गाची व्याख्या ठरवलेली नाही. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर ती व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली होती हे अद्याप तरी आपण शोधू शकतो. त्यामुळे याला समूह संसर्ग म्हणता येणार नाही. जेव्हा एखादी कोरोनाबाधित व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली, हे सांगणे अशक्य होईल, तेव्हा सामूहिक संसर्ग सुरू झाला असे म्हणता येईल.
सामूहिक संसर्गावरून काही तांत्रिक दावे केले जात आहेत, त्यात तथ्य नाही. स्थानिक पातळीवर कोरोना रुग्ण वाढले म्हणजे समूह संसर्ग झाला असे नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह पश्चिम बंगालमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे म्हटले होते. त्यावर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.









