वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन करणारे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. ‘फेम इंडिया’ आणि ‘आशिया पोस्ट सर्व्हे’ यांनी भारतातील 50 प्रभावशाली व्यक्तींमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 13 व्या क्रमांकावर स्थान दिले आहे. या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम स्थानावर आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक दहाव्या स्थानी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन 12 व्या स्थानी आहेत.
‘फेम इंडिया’ आणि ‘आशिया पोस्ट सर्व्हे’ 2020 मध्ये 12,000 लोकांनी सहभाग घेतला. या लोकांनी आपली मते सर्व्हेमध्ये व्यक्त केली आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱयांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनत 15 वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱया शीला दीक्षितांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याचबरोबर दिल्ली विधानसभेवर सलग विजय संपादन करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
यशस्वीपणे पाच वर्षे पूर्ण
मागील निवडणुकीत जिंकलेल्या 67 जागांप्रमाणे यश मिळाले नसले तरीही यावेळी मिळालेला विजय त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे. कारण केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली मागील कार्यकाळात सरकारने यशस्वीपणे पाच वर्षे पूर्ण केली होती. त्याचीच परिणती म्हणून जनतेने 62 जागा केजरीवाल सरकारच्या पदरात टाकल्या.









