बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ते कोल्हापूर या मार्गावर विमान सुरू होईल, अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. परंतु ट्रुजेड एअर कंपनी येत्या 17 जानेवारीपासून विमानसेवा सुरू करणार आहे. हा देशातील सर्वात कमी अंतराचा विमान मार्ग असणार आहे. त्यामुळे या विमानप्रवासाची प्रत्येकालाच आता उत्सुकता लागली आहे.
ट्रुजेट एअर कंपनी बेळगावमध्ये केव्हा दाखल होणार याची प्रत्येक प्रवाशाला उत्सुकता लागली होती. कारण ही विमान कंपनी एकाच वेळी 4 नव्या मार्गांवर विमाने सुरू करणार होती. मागील सहा महिन्यांपासून ही सेवा सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर जानेवारी 2020 मध्ये ती खरी ठरली आहे. हे लिंक विमान असल्यामुळे फक्त बेळगाव अशी सेवा नसून इतर शहरांना जोडण्यात येणार आहे.
बेळगाव ते कोल्हापूर हा 118 किलोमीटरचा रस्ता आहे. रेल्वेच्या साहाय्याने जाण्याकरिता मिरजमार्गे 185 कि.मी.चे अंतर आहे. हवाई मार्गे अवघ्या 97 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. अवघ्या 30 मिनिटांमध्ये विमान कोल्हापूरला पोहचणार आहे. देशातील सर्वात कमी अंतराचा हा हवाई प्रवास असणार आहे.









