वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा हंगामाला 16 नोव्हेंबरपासून प्रारंभ केला जाणार असून विविध वयोगटातील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीत देशातील सर्व स्पर्धात्मक टेनिस स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या होत्या.
कोरोना महामारीमुळे 16 मार्चपासून देशातील विविध स्पर्धात्मक टेनिस हालचाली पूर्णपणे थांबविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू केल्या जाणार आहेत. 12, 14 आणि 16 वर्षांखालील वयोगटातील टेनिस स्पर्धा सुरूवातीला घेतल्या जातील. प्रत्येक स्पर्धेचा कालावधी तीन दिवसांचा ठेवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी कमाल 32 टेनिसपटूंचा ड्रॉ राहील, अशी माहिती अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. या संघटनेच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये देशातील विविध वयोगटातील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. 2020 च्या टेनिस हंगामाला 16 नोव्हेंबरपासून प्रारंभ केला जाणार असून कोरोना संदर्भात शासनाच्या सर्व नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या अधिकृत सर्कीट बाहेर देशात कोणतीही खासगी टेनिस स्पर्धा भरविण्यास परवानगी राहणार नाही, असे संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे देशातील विविध राज्यांच्या टेनिस संघटनांना या आगामी स्पर्धा संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.









