ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात एकीकडे लसीकरणाला वेग आला असतानाच महाराष्ट्र, केरळ, पंजाब आणि मध्यप्रदेशसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावत आहे.
भारतात मागील 24 तासात 16 हजार 577 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 10 लाख 63 हजार 491 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 825 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 34 लाख 72 हजार 643 लोकांना लस देण्यात आली आहे.
गुरुवारी 12,179 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 50 हजार 680 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 55 हजार 986 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा वेगाने फैलावत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्याचा आरोग्य मंत्रालयाचा प्रयत्न आहे.









