गोधन संरक्षणासाठी गो-कॅबिनेटची निर्मिती
वृत्तसंस्था / भोपाळ
देशातील पहिले गो-कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला आहे. ही कॅबिनेट गायींचे संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी ट्विट करत माहिती दिली आहे.
पशूपालन, वन, पंचायत तसेच ग्रामीण विकास, महसूल, गृह आणि कृषी कल्याण विभाग गो-कॅबिनेटमध्ये सामील असणार आहेत. याची पहिली बैठक गोपाष्टमीच्या दिवशी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता गोअभयारण्य सालरिया आगर-मालवा येथे आयोजित करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात गो-कॅबिनेटची घोषणा करणारे शिवराज सिंग आता त्याची निर्मिती करणार आहेत. शिवराज सरकारने गोमातेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी काहीच केलेले नाही. याउलट काँग्रेस सरकारने चाऱयासाठी 20 रुपये प्रति गायीची केलेली तरतूदही कमी केल्याची टीका माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे.









