महाव्यवस्थापकपदी सागरतज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी : पर्यटनात, किनारपट्टीसह जलाशयांवर लक्ष केंद्रित
प्रतिनिधी / देवबाग:
सागरी किनारपट्टीबरोबरच आता महाराष्ट्रात इतरत्रही जलपर्यटनाची संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याच्या पर्यटन खात्याने देशातील पहिल्या जलपर्यटन विभागाची स्थापना केली आहे. या विभागाच्या महाव्यवस्थापक पदी सागरतज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील नद्या, तलाव आणि धरणे यासारख्या जलाशयांमध्ये जलपर्यटन सुरू करून याठिकाणी रोजगाराचे नवे दालन खुले करण्यासाठी हा विभाग काम करणार आहे. या विभागाच्या माध्यमातून राज्याच्या जलपर्यटनाची व्याप्ती कशी वाढविता येईल, याबाबतचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
पर्यटन व्यवसायात जलपर्यटनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे यातून उपलब्ध होणाऱया रोजगाराच्या संधीचे महत्व ओळखून राज्याच्या पर्यटन खात्याने स्वतंत्र जलपर्यटन विभागाची स्थापना केली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सागरी आणि ऐतिहासीक गड, किल्ले, मंदिरे, सागरी बीच अशा अनेकविध पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याचे काम सुरू होते. अलिकडच्या काळात सागरी पर्यटनासह राज्यभरातील गोडय़ा पाण्याची जलाशये, नदी, खाडी आदी ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित तारकर्ली येथील इसदा, बोट क्लब नाशिक, बोट क्लब गणपतीपुळे, बोट क्लब पवई असे काही जलपर्यटन संबंधित प्रकल्प सुरू आहेत. या सर्वांसह भविष्यात होऊ घातलेल्या जलपर्यटनाशी संबंधित प्रकल्प विकसीत करण्याची जबाबदारी नव्याने आखण्यात आलेल्या जलपर्यटन विभागाची राहणार आहे. या शाखेचे महाव्यवस्थापक म्हणून नुकतीच डॉ. सारंग कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जलपर्यटनामार्फत राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्मयता गृहित धरून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्यात पर्यटन विभागांतर्गतच जलपर्यटन हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागांतर्गत यापुढे राज्यातील ठिकठिकाणी जलाशयांमध्ये पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
सागरतज्ञ डॉ. कुलकर्णी हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ राज्यात जलपर्यटन क्षेत्राशी निगडित कार्यरत असून देशातील पहिला स्कुबा डायव्हिंग प्रकल्प तारकर्ली येथे त्यांनी सुरू केला आहे. सागरी क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ही नेमणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यात जलपर्यटनदृष्टय़ा अनेक प्रकल्प उभे करणे शक्मय असून त्यातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन खात्याचे दोन्ही मंत्री यासाठी आग्रही आहेत. लवकरच या विभागाचा आराखडा तयार करून शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.









