मॅकलॉइड रसेल इंडिया आघाडीवर, कमी उत्पादनाने कंपन्यांचा नफा वाढला
वृत्तसंस्था/ कोलकाता
सध्याला लोकसंख्येचा मोठा भाग घरी बसून आपला कार्यभार सांभाळताना दिसत आहे. घरी राहणाऱयांनी चहा पिण्यावर दिलेला जोर व उत्पादनात झालेल्या घटीचा चहा उत्पादक कंपन्यांनी चांगलाच नफा पदरात पाडून घेतला आहे.
घरोघरी चहाची मागणी कोरोनाकाळात वाढली असल्याचे दिसून आले आहे. महामारीमुळे चहाचे कमी उत्पादन घेतले गेले आहे. सर्वाधिक मोठी चहा उत्पादक कंपनी मॅकलॉइड रसेल इंडियाने सप्टेंबर तिमाहीअखेर 148.29 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षाच्या तुलनेमध्ये हा नफा 63 टक्के अधिक असल्याचा दावा कंपनी करते आहे. दुसरीकडे जय श्री अँड इंडस्ट्रीजला 76.67 कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. गुडरकि ग्रुप या आणखी एका चहा उत्पादक कंपनीनेही 72 कोटी 85 लाख रुपयांचा निव्वळ नफा सप्टेंबर तिमाहीअखेर कमावला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यानच्या काळात मॅकमलॉइडचा महसुल 52 टक्के, गुडरिकचा 37 टक्के आणि जय श्री यांचा महसूल 38 टक्क्मयांनी वाढला आहे. खराब हवामान व महामारीमुळे यंदा चहाच्या उत्पादनात घट दिसून आली.
घरात वापर वाढला,बाहेर कमी
चहाचा एकंदर वापर लक्षात घेतल्यास कोरोनाकाळात घरात चहाचा वापर जास्त झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी घरात राहणं पसंत केलं होतं, काहींनी आपले काम घरातूनच सुरू ठेवले आहे. याचा परिणाम घरगुती चहा खपावर चांगला दिसून आला. घरात चहा प्यायचे प्रमाण तीन ते चार टक्के इतके वाढले असून बाहेर विक्री होणाऱया चहाच्या खपावर मात्र विपरीत परिणाम दिसून आला आहे. बाहेर विकल्या जाणाऱया चहाच्या विक्रीत 20 ते 25 टक्के घट झाली आहे. कोरोना काळात व्यवसाय, कार्यालये येथे कामगारांची संख्या व येणाऱया-जाणाऱयांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे चहाची मागणी बाहेर तुलनेने कमी होती.









