‘आयएनएस हंस’चा हिरक महोत्सव : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सहभाग

प्रतिनिधी /वास्को
भारतीय नौदल आपल्या आयएनएस हंस या तळाचा हिरक महोत्सव साजरा करीत आहे. पाच सप्टेंबर हा नौदलाचा प्रमुख हवाई तळ असलेल्या हंसचा स्थापना दिवस आहे. आयएनएस हंसची स्थापना दक्षिण भारतातील कोईमतूर येथे 1961 साली झाली होती. गोवा मुक्तीनंतर दाबोळीचा हवाई तळ नौदलाने 1962 साली ताब्यात घेतला. 1964 साली आयएनएस हंस तळाचे कोईमतूरहून दाबोळीत स्थलांतर करण्यात आले.
हिरक महोत्सवाच्या साजरीकरणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही उपस्थिती आज सोमवारी लाभणार आहे. आज आयएनएस हंस हवाई तळाला प्रेसिडेन्स कलर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. हिरक महोत्सवानिमित्त आयएनएस हंसच्या इतिहासाला उजाळाला मिळणार आहे.
नौदलाने यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार आयएनएस हंसची स्थापना कोईमतूर येथे झाली होती. 1958 मध्ये सी हॉक, अलिझ व व्हँपायर अशा हवाई जहाजांसह नेव्हल जेट पलाईट उभारण्यात आले होते. त्यानंतर 5 सप्टेंबर 1961 साली ते आयएनएस हंस म्हणून कार्यान्वीत करण्यात आले. मात्र, 19 डिसेंबर 61 साली गोवा मुक्त झाल्यानंतर दाबोळीचा हवाई तळ भारतीय नौदलाच्या ताब्यात आला. भारतीय नौदलाला आयएनएस हंस तळासाठी भौगोलिकदृष्टय़ा दाबोळीचा हवाई तळ योग्य वाटल्याने आयएनएस हंस दाबोळीच्या हवाई तळावर स्थलांतरीत करण्यात आला.
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत गौरवशाली योगदान
प्रारंभी अवघ्याच काही हवाई जहाजांसह सुरू करण्यात आलेला आयएनएस हंस तळ आता मोठय़ा प्रमाणात विस्तारलेला असून गेल्या सहा दशकांमध्ये आयएनएस हंसने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत गौरवशाली योगदान दिले आहे. आज आयएनएस हंसकडे चाळीसपेक्षा अधिक लढाऊ विमानांचा ताफा आहे. आयएनएस हंसचा हवाई तळ मागच्या साठ वर्षांत नागरी उड्डाणांसाठीही मोठय़ा प्रमाणात उपयोगी आलेला असून देशी व आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणे चोवीस तास होत असतात. वर्षांत सरासरी 29 हजार हवाई उड्डाणे या विमानतळावरून झालेली आहेत.
हंसकडे अत्त्याधुनिकतेसह मोठा ताफा
आयएनएस हंस हे भारतीय नौदलाचे प्रंटलाईन एअरस्कॉड्रन असून डॉर्नियर 228 सह आयएनएएस 310 कोब्राज्, आयएनएएस 315 विंग स्टालियन्ससह लांब पल्ल्याचे सागरी गस्ती जहाज, कामोव 31 हेलिकॉप्टर्स, आयएएस 303 ब्लॅक पँन्थर्स, आयएनएएस 300 व्हाईट टायगर्स, मिग 29 के, आयएनएस 323 हॅरीयर्स,, एएलएच एमके 3 हेलिकॉप्टर्स असा ताफा हंसकडे आहे. या तळावर लवकरच बोईग पी81 हे लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान हाताळले जाणार आहे.
मागच्या साठ वर्षांत आयएनएस हंसने नौदलात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आयएनएस हंसने स्थानिक प्रशासनाला मदत करताना शोध आणि बचाव कार्य, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहकार्य, सामाजिक उपक्रम तसेच कोरोना काळात ‘वंदे भारत’ हवाई सेवा पुरवण्याचेही कार्य आयएनएसने हंस पार पाडले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोव्यात दाखल झाले असून आज सोमवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. आयएनएस हंस नौदल तळावरील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
दाबोळी विमानतळावर राष्ट्रपतींचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सभापती राजेश पाटणेकर व इतरांनी स्वागत केले. त्यांचे गोव्यात 5 ते 7 सप्टेंबर असे वास्तव्य रहाणार असून एकच अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांची ही अलीकडच्या काळातील गोव्याला दुसरी भेट आहे.









