मिरज / प्रतिनिधी
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या देशाच्या जडणघडणीत बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्वपूर्ण असून देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. देशाचे बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत व विश्वासार्ह होण्यासाठी बँकेत ठेवी ठेवणारा ठेवीदारही तितकाच महत्वाचा आहे. बँक अवसायानात गेल्यापासून ९० दिवसाच्या आत ठेवीदारांना ५ लाख रूपये पर्यंतच्या ठेवीदारांना त्या परत मिळतील अशी कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदार सुरक्षित होईल. बँकिंग क्षेत्रात ठेवीदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. फेब्रुवारी 2021 मध्ये विमा कायद्यात केलेल्या बदलांमुळे अवसायानात गेलेल्या बँकातील सुमारे 1 लाख ठेवीदारांना ठेवी परत करण्यात आल्या असून यापुढील काळात 3 लाख ठेवीदारांना 1 हजार 300 कोटी रूपये ठेवी परत करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
अवसायानात गेलेल्या बँक धारकांना विमा संरक्षणाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतच्या ठेवी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दिल्ली येथे विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परत करण्यात आल्या. हा कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीव्दारे ऑनलाईन सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे विज्ञान भवन येथून मिरज येथील आळतेकर हॉल येथे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ऑनलाईन पध्दतीने केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण, केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पंकज चौधरी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास उपस्थित होते. तर आळतेकर हॉल मिरज येथे कार्यक्रमास केंद्रिय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, बँक ऑफ इंडीयाचे जनरल मॅनेंजर नितीन देशपांडे, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक मुकुंद कुलकर्णी, बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक विवेक घाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश हरणे तसेच बँक ऑफ इंडियाचे अधिकारी अनंत बिळगी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र शासन काम करत असून विविध योजनांच्या माध्यमातून विकास करीत आहे. देशातील सर्व घटकांना विमा कवच देण्याबरोबरच देशातील प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात बँक सुविधा उपलब्ध होण्यासाठी 5 किलोमिटरच्या अंतरावर बँकींग पाँईंट उभे करण्यात आले असून याची संख्या सुमारे 8 लाख 50 हजार आहे. त्याचबरोबर कर्ज सुविधाही सुलभ करण्यात आली असून छोटे व्यापारी, उद्योग यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदत केली जात आहे. देशातील 85 टक्के अल्पभूधारक यानांही कर्ज सुविधा देण्यात येणार असून किसान क्रेडीट कार्ड व्दारे कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिली जात आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून देशात 50 टक्के पेक्षा जास्त खाती महिलांची असून 80 टक्के महिला आता बँक खातेधारक झाल्या आहेत. या बँक खात्याच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येईल. अवसायानात जाणाऱ्या सहकारी बँका यांच्यावर आता आरबीआयच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते. तरीही या बँकांच्या सक्षमीकरणासाठी देशात सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली आहे.
मिरज येथील आळतेकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रिय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, केंद्र शासनाने विमा धोरणात बदल करून 1 लाखापर्यंत असणाऱ्या ठेवींचे संरक्षण 5 लाखापर्यंत वाढविले. यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य जनता काटकसर करून भविष्यासाठी ठेवी ठेवते. या ठेवींना केंद्र शासन आता सुरक्षा देणार असल्यामुळे ठेवीदारांमध्ये विश्वासार्ह वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्जेराव दादा नाईक बँक शिराळा ही अवसायानात निघाली. यामुळे 4 हजार पेक्षा जास्त खातेदारांचे कष्टाचे पैसे बुडण्याची वेळ आली. पण विमा कवचाच्या आधारे त्यांची रक्कम आता परत मिळणार आहे. यासाठी केंद्राच्या माध्यमातून 41 कोटी इतकी रक्कम ठेवीदारांना मिळेल. 5 लाखापर्यंत ठेवी असणाऱ्या जवळपास 90 टक्के ठेवीदारांचे पैसे परत मिळतील.
प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी खासदार संजय पाटील, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक मुकुंद कुलकर्णी, बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक विवेक घाटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध बँकांचे मॅनेंजर, कर्मचारी, ठेवीदार, बँक सभासद उपस्थित होते.








