ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचा साठावा वर्धापनदिन आज साधेपणाने साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असे, मोदींनी म्हटले आहे.
मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!’
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज 60 वर्षे पूर्ण झाली. आज महाराष्ट्राचा हिरक महोत्सवी दिवस आहे.









