हुतात्म्यांच्या गावांची माती औरंगाबादचे उमेश जाधव करताहेत एकत्र
प्रतिनिधी / बेळगाव
देशाची एकता कायम राहावी, यासाठी एक तरुण देशभ्रमंतीला निघाला आहे. पुलवामा, कारगिलच्या युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांच्या गावांना जावून तेथील माती जमा केली जात आहे. आजवर त्या तरुणाने 6 हजार 700 कि. मी. चा कारने प्रवास केला आहे. बुधवारी या तरुणाने बेळगावला भेट दिली. त्यावेळी कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी त्याचे बेळगावमध्ये स्वागत केले.

मूळचे औरंगाबाद परंतु मागील अनेक वर्षांपासून बेंगळूर येथे वास्तव्यास असणारे उमेश जाधव हे देशभ्रमंती करत आहेत. 9 एप्रिल 2019 पासून त्यांनी आपल्या भ्रमंतीला सुरुवात केली. 9 एप्रिल 2021 मध्ये गुजरात येथे मोहिमेची सांगता होणार आहे. कोणत्याही प्रायोजकाशिवाय ही मोहीम लोकांनी दिलेल्या देणगीतून राबविली जात आहे. बुधवारी दुपारी त्यांचे बेळगावमध्ये आगमन झाले. शंकरगौडा पाटील यांनी त्यांचे स्वागत करून देशाला अशा तरुणांची गरज असल्याचे सांगितले. जरा हटके करणाऱया व्यक्तींना प्रोत्साहन देणेही तितकेच गरजेचे असल्याचे सांगून पाटील यांनी उमेश यांचे कौतुक
केले.
हुतात्म्यांच्या गावांच्या मातीने साकारणार देशाचा नकाशा…
देशभर फिरून उमेश हे हुतात्मा जवानांच्या गावांची माती एकत्रित करीत आहेत. सर्व माती एकत्रित झाल्यानंतर काश्मीर येथे त्या मातीने देशाचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. यामुळे देशातील हुतात्म्यांना आदरांजली वाहून एकात्मता दाखवून देण्यात येणार असल्याचे उमेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.









