नव्या कृषी कायद्यांविरोधात केनवडे फाटा येथे आंदोलन
वार्ताहर / व्हनाळी
केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी नवीन तीन कायदे अत्यंत घातक असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जनजीवन उध्दवस्त करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
घाटगे म्हणाले की, आज आंदोलनाचा तेरावा दिवस आहे. तरीही केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा आणि भावना ओळखता आले नाही हे दुर्दैवी आहे. असे सांगत सरकारच्या या नव्या कायद्यांद्वारे बाजार समित्या बरखास्त केल्या तर शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला वाली कोण? असा सवाल करत या नव्या कायद्यांमुळे “भारत कृषिप्रधान देश” हि परंपरागत असलेली ओळखच कायमची संपणार आहे. देशी -परदेशी कंपन्यांच्या अधिपत्याखाली येथील शेतकरी नाहक भरडला जाणार असून सामान्यांना जीवन जगणं ही मुश्किल होईल अशी खंतही श्री घाटगे यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात जि.प.सदस्य, गोकुळचे संचालक श्री अंबारिषसिंह घाटगे (दादा), अन्नपूर्णा कारखान्याचे संचालक एम.बी. पाटील (सिध्दनेर्ली ), सदाशिव पाटील (एकोंडी), अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेचे संचालक विश्वास पाटील (व्हनाळी), दत्ता दंडवते, आनंदा मगदूम (गोरंबे), सुरेश मर्दाने, शरद पाटील (व्हनाळी), आनंदा तळेकर (अध्यक्ष), धोंडीराम एकशिंगे, बाजीराव पाटील (केनवडे), कॅप्टन काशिनाथ जिरगे (आणूर), रणजित मूडुकशिवाले (मळगे बु), अरुण पाटील (शंकरवाडी) यांच्यासह केनवडे पंचक्रोशीतील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.सुभाष पाटील (कुरणी) यांनी मानले. आंदोलन स्थळी कागल पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतीची करार पद्धत जाचक
नव्या कृषी विषयक कायद्यामध्ये शेती करार पद्धतीने देणेचा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने देशातील आणि परदेशातील कंपन्या शेती करार पद्धतीने घेण्याचे तरतूदही केली आहे. सदर शेतीमध्ये बांधकाम करण्याचा अधिकारही कंपन्यांना दिलेला आहे. मात्र हे बांधकाम करार संपल्यानंतर काढुन टाकण्याचे बंधन मात्र कंपन्यांवर राहणार नाही हे फार मोठे संकट असून हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे आहे.









