प्रतिनिधी / कोल्हापूर
तीन कृषी कायदे, इंधन दरवाढ, केंद्रीय वीज विधेयक आणि चार कामगार संहिता व महागाई विरोधातील देशव्यापी बंदला कोल्हापूरात अल्प प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह पदाधिकाऱयांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर उपोषण करून भारत बंद मध्ये काँग्रेस पक्षाचा सहभाग नोंदवला. तर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, संयुक्त कामगार संघटना समन्वय समितीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती. त्याला शहरासह जिह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठांसह इतर ठिकाणीही दैनिंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु असल्यामुळे बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते बिंदू चौकात जमले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. केंद्रीय तीन कृषी कायदे , वीज विधेयक आणि चार कामगार संहिता रद्द करण्याची त्यांनी मागणी केली .
यावेळी बोलताना शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी केंद्रसरकारच्या कायद्याविरोधातील जनभावना प्रशासनासमोर मांडल्या. केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचे जीवन उध्वस्त करणारे कायद्यांना जनतेचा विरोध डावलून माथ्यावर मारण्याचा सपाटा लावला आहे. त्याला शेतकरी, शेतमजुर आणि संघटीत असंघटीत कामगारांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले. तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती सरकार कराचे आझे लादत असल्याने सामान्य जनतेच्या आवक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारने अवाजवी कर रद्द करून इंधनाचे दर त्वरीत कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
शिष्टमंडळात अखिल भारतीय किसान सभेचे उदय नारकर, राज्य किसान सभेचे नामदेव गावडे ,जनता दलाचे वसंतराव पाटील , आयटकचे एस.बी.पाटील , सीटूचे प्रा. सुभाष जाधव , जनता दलाचे रवींद्र जाधव , भाकपचे सतीशचंद्र कांबळे , माकपचे शंकर काटाळे, सर्व श्रमीक संघाचे अनंतराव कुलकर्णी, शेकापचे बाबुराव कदम, बाबा मिठारी, दिलदार मुजावर , शिवाजी माळी आदी आंदोलनामध्ये सहभागी होते.









