मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील देशभरात अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना तसेच विद्यार्थीवर्ग आदी सर्वांना माघारी आणण्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. या अनुषंगाने तसेच विदेशामध्येही अडकलेल्या गोमंतकीयांना देखील आणण्याकरिता एक पोर्टल तयार केले आहे.
वरील माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री उशिरा दै. तरुण भारतशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, देशाच्या विविध भागात गोमंतकीय विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सेवेस असलेले नागरिक या सर्वांना गोव्यात येण्याची आस लागलेली आहे. या अनुषंगाने त्यांची माहिती मिळविण्याकरिता गोवा सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. ज्यांना गोव्यात यायची इच्छा आहे त्यांनी त्या अनुषंगाने https://www.goa.gov.in/return-to-goa/ या पोर्टलवर स्वतःची माहिती कळवावी.
मुंबई, पुणे, बंगळूर वा देशातील अन्य कोणत्याही शहरांमध्ये मोठय़ा संख्येने गोमंतकीय असतील तर त्यांना आणण्यासाठी खास बसची देखील व्यवस्था करण्यात येईल. या व्यतिरिक्त जगभरात जे गोमंतकीय खलाशी वा अन्य कुणीही नोकरीवर जाऊन अडकलेले असतील तर त्यांना देखील आणण्यासाठी त्यांनीही या पोर्टलवर सविस्तर माहिती द्यावी. ज्यायोगे सरकारला त्यांना मदत करणे शक्य होईल. भारत सरकारच्या मदतीने तमाम गोमंतकीयांना परत आणण्यात येईल.









