प्रतिनिधी /बेळगाव
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असून, महापालिका व्याप्तीतील विविध उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. काही रस्त्यांचे काँक्रिटीकरणदेखील करण्यात आले आहे. टिळकवाडी परिसरातील देशमुख रोडचा विकास करण्यात आला. मात्र, या ठिकाणी असलेल्या उद्यानाची संरक्षक भिंत मोडकळीस आली आहे. या भिंतीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तसेच महापालिका, बुडाच्यावतीने उद्यानांचा विकास करण्यासाठी कोटय़वधी निधी खर्ची घालण्यात येत आहे. मात्र, उद्यानांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या संरक्षक भिंती घालण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. टिळकवाडी देशमुख रोड येथील उद्यानाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला होता. येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणदेखील स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आले आहे. पण या उद्यानाच्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीसाठी कोणतीच उपाययोजना राबविण्यात आली नाही. देशमुख रोडलगत असलेली संरक्षक भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही क्षणी ही भिंत कोसळण्याचा धोका आहे. भिंतीवरील ग्रील रस्त्यावर आली आहे. त्यामुळे पादचाऱयांना किंवा वाहनधारकांना याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याशेजारी पेव्हर्स घालण्यात आल्याने पादचारी ये-जा करीत असतात, पण अंधारात ग्रील निदर्शनास न आल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
हा रस्ता रहदारीचा असल्याने भिंतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा सदर भिंती कोसळल्यास वाहनधारकांना इजा पोहोचू शकते. स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे करताना मोडकळीस आलेल्या भिंतीची दुरुस्ती करणे आवश्यक होते. पण स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या उद्यानाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









