वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना रुग्णांचा वाढता आलेख मंगळवारीही कायम राहिला. दिवसभरात 94 नवीन रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण हे मध्य प्रदेशमध्ये आढळले. झारखंडमधील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने देशातील 28 राज्यात कोरोना पसरल्याचेही स्पष्ट झाले. देशभरात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 441 झाली असून शंभरहून अधिक रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
आरोग्य, परराष्ट्र, गृह आणि आयसीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शीघ्र कृती दल तयार केले आहे. वस्त्राsद्योग मंत्रालयाच्या मदतीने आम्ही उपचारासाठी लागणारी सामुग्री, उपचारासाठी आवश्यक व्यक्तिगत संरक्षण साधणे (पीपीई), मास्क तयार करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दक्षिण कोरिया, तुर्की आणि व्हिएतनाम या देशांकडून उपचार साधनसामुग्री घेण्याचे निश्चित केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 30 मार्च रोजी देशातील 15 हजार परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आयसीएमआरचे प्रमुख जी. गंगाखेडकर यांनी सांगितले की, आतापर्यत 42 हजार 788 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. यासाठी 123 प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. देशातील 49 खासगी तपासणी केंद्रांना परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
20 हजार रेल्वे डब्यांचे होणार विलगीकरण कक्षात रूपांतर
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास करण्यात येणाऱया उपाययोजना आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. 20 हजार रेल्वे डब्यांचाही वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येणार आहे. या माध्यमातून 3 लाख 20 हजार रुग्णांवर उपचार करण्यात येतील. यासाठी रेल्वेचे पाच विभाग काम करीत आहेत.
देशभरात 21 हजार 64 निवारा छावण्या
देशभरातील लॉकडाऊनचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आढावा घेण्यात आला. देशभरात सुमारे 21 हजार 64 निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 6 लाख परप्रांतीय मजूर आहेत. त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गटाची बैठक
मंगळवारी कोरोनाच्या मुद्दय़ावर केंदीय मंत्री गटाची बैठक झाली. यामध्ये आरोग्य मंत्री हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या समवेत अन्य मंत्री उपस्थित होते. देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा झाली. सर्व राज्यांनी कोरोनावर उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल सज्ज ठेवावे. दुसऱया राज्यांतून येणाऱया प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
परप्रांतीय कामगारांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
देशभरातील लॉकडाऊननंतर लाखो परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी सर्व राज्यांमध्ये झुंबड केली आहे. यामुळे कामगाराचे अतोनात हाल होत आहेत याप्रश्नी वकील ए. ए. श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले की, निवारा छावणीत ठेवण्यात आलेल्या कामगार व त्याच्या कुटुंबीयाना दररोज भोजनाची सोय करणवी. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी. तसेच कोरोना संसर्ग झालेल्या कामगारांवर योग्य उपचार व्हावेत. निवारा छावणीत पोलिसांऐवजी स्वयंसेवी संस्थांकडे याची जबाबदारी देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सद्यःस्थितीत एकही कामगार रस्त्यावर नाही. 22 लाख 88 हजार कामगारांच्या निवाऱयाची सोय केली आहे. निवारा छावणीतील कामगारांना भजन-कीर्तनासह नमाज पठणासाठी सुविधा देण्याचीही न्यायालयाने सूचना केली. यावर सरकार लवकरच निर्णय घेईल, असे गृहसचिवांनी सांगितले.









