केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची घोषणा : कोकण रेल्वे मार्गाला मात्र ठेंगा
प्रतिनिधी / कुडाळ:
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 12 सप्टेंबरपासून 80 रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची घोषणा केली आहे. वेळापत्रकही जाहीर केले. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर एकही रेल्वे धावणार नाही. पेडणे बोगद्यातील काही भाग कोसळल्याने सावंतवाडी स्थानकापर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस धावेल, असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला आहे.दरम्यान, पेडणे बोगद्यातील कोसळलेल्या भागाचे काम दिवस-रात्र सुरू असून पाऊस पडला नाही, तर आठ ते दहा दिवसांत काम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशभरात 80 रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची घोषणा करीत यादी जाहीर केली. यात मुंबई-नाशिकöमनमाड या मुंबईतून सुटणाऱया एकमेव रेल्वेचा समावेश आहे. अन्य एकाही रेल्वेचा यादीत समावेश दिसत नाही. दिल्ली, हावडा, लखनौ, इंदोर, पुरी, कोटा, डेहराडून, जबलपूर, अजमेर, जयपूर, ग्वाल्हेर, बेंगलोर, गुवाहाटी, जोधपूर, गोरखपूर, बिकानेर, चेन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद या भागातील गाडय़ांचा समावेश आहे.
मुंबई सीएसटी ते मनमाड या मुंबईतून सुटणाऱया एकमेव रेल्वेचा समावेश आहे, तर हैद्राबाद-परभणी व मसुरी-सोलापूर या महाराष्ट्रातील गाडय़ांचा समावेश आहे.
कोकण रेल्वे मार्गावर एकही रेल्वे नाही
केंद्रीय रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील एकही रेल्वे नाही. पेडणे बोगदा कोसळल्याने किमान सावंतवाडी स्थानकापर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस सुरू केली जाईल, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे. त्यामुळे गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूरमधील प्रवाशांची निराशा झाली आहे. पुणे-सांगली, मडगावमार्गे कोकण रेल्वे मार्गावर एकही रेल्वे जाहीर केली नसल्याने अनलॉक जाहीर करूनही कोकणसह कोकण रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने ठेंगा दाखविला आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत पेडणे बोगदा वाहतुकीस खुला
पेडणे जवळील मालपे-खाजणे दरम्यान कोसळलेल्या पेडणे बोगदा भागाची उभारणी करण्याचे काम कोकण रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून दिवसरात्र सुरू आहे. पाऊस कमी असल्याने कामाने वेग घेतला आहे. पाऊस कमी झाला, तर हे काम पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील, अशी अपेक्षा अभियंत्यांनी व्यक्त केली. मात्र, पाऊस वाढला, तर हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पेडणे बोगदा वाहतुकीस खुला होईल, असे सांगण्यात आले.









