अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, उद्धवा माझी प्राप्ती होण्याला भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे दोन मार्ग आहेत. त्यात ज्ञानमार्ग फार बिकट आहे पण भक्तिमार्ग हा निर्विघ्नपणाने भक्ताला माझ्याकडे पोचवितो. ज्ञानमार्गात अनेक प्रकारची विघ्ने येतात. नाना प्रकारच्या कल्पना लढवण्यातच विद्वत्ता नाहीशी होते, म्हणून विद्वानांना माझी प्राप्ती होत नाही. भक्तिमार्गाने जात असताना माझ्या गुणांचे वर्णन करताना किंवा हरिकथा, नामसंकीर्तन करताना तेथे विघ्नाचा शिरकाव होऊ शकत नाही. परिणामी भक्तांना मोक्षाची द्वारे खुली होतात. माझे भक्त पूर्ण निरिच्छ असतात. ते मोक्षाची आशा धरीत नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांच्या भावार्थावर भुललेला असतो. तात्पर्य, निर्विघ्नपणे माझ्याजवळ यावयाला भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्रिवार खरे आहे. उद्धवाला हरिभक्तीची गोडी होतीच, म्हणून हे ऐकताच त्याने आनंदाची गुढीच उभारली. त्याने भगवंतांना विचारले, ‘इतकी तुझी भक्ती जर सुलभ आहे, तर सारेच लोक तुझी भक्ती का करीत नाहीत?’ तेव्हा देव म्हणाले, उद्धवा ! भाग्याशिवाय ही माझी भक्ती खरोखर कोणालाच घडावयाची नाही. उद्धवा! सत्संगानेच भक्तीची प्राप्ती होते, हे तू पक्कं समज. माझी भक्ती संतांपाशी वाट पहात उभी असते. त्यावर उद्धवाने विचारले, ‘संताना जर तू ‘माझे’ असे म्हणतोस तर बाकीचे लोक कोणाच्या हवाली केलेस ? तसेच तुझी भक्ती रात्रंदिवस संतांपाशीच का असते?’ उद्धवा! संतांच्या भजनावर माझी अतिशय श्रद्धा आहे. संतांची सेवा करायचे मला कारण काय असे विचारशील, तर त्याचे उत्तर ऐक. मी अनंत म्हणजे कोणालाही आवरला जाणारा नव्हे. पण संतांनी मला आपल्या भक्तीने बांधून टाकले आहे. ते जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ जाणतच नाहीत. त्यांनी त्यांचे स्वकर्म असते ते मलाच अर्पण केलेले असते. त्यांनी आपले सर्व धर्म, देह, घर, रूप, नाम आश्रमधर्म, मलाच अर्पिलेले असतात. कल्पान्तसमयी होणाऱया कडकडाटाच्या धाकाने सर्व विश्व भिते व लयास जाते, अशा प्रकारची अरिष्टे ओढवली असताही ते धैर्याने माझ्यापासून ढळत नाहीत. आकाश तुटून पडले असताही आश्रयासाठी ते माझ्यावाचून दुसऱयाची वाट पहात नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांचा दास होऊन राहिलो आहे. भावार्थाचा महिमा मोठा आश्चर्यकारक आहे. मी विश्वात्म्याचाही ते आत्मा झालेले आहेत. असा त्यांचा आणि माझा एकोपा आहे, म्हणूनच मला पुरुषोत्तमाला त्यांनी वश केले आहे. संतांना आणि मला कल्पांतांतसुद्धा भिन्नभाव नाही, हे लक्षात ठेव, ही माझ्या जिवाची सर्वात गुह्य गोष्ट तुला सांगितली. माझ्या भक्तीनेच संत माझे झाले आहेत. इतर लोक मला भजत नाहीत, म्हणून मी त्यांना अदृष्टपाशात बांधून काळाच्या स्वाधीन केले. पण काळात माझ्या संतांजवळ येण्याचे सामर्थ्य नाही. संतांचे सर्व काम करताना मला संकोच वाटत नाही. त्याची प्रचिती पुढील अभंगातून मिळते. देव मनातील शुद्ध भावाशिवाय इतर गोष्टींना किंमत देत नाही, हे प्रस्तुत अभंगातून तुकोबांनी इतिहासातील उदाहरणे देऊन सांगितले आहे.
उंच नीच काही नेणे भगवंत ।ति÷s भावभक्त देखोनिया ।।1।।दासीपूत्र कण्या विदुराच्या भक्षी ।
दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ।।2।।चर्म रंगू लागे रोहिदासासंगे ।कबिराचे मागे शेले वीणीं ।।3।।
सज्जन कसाया विकू लागे मांस ।माळय़ा सावत्यांस खुरपू लागे ।।4।।नरहरी सोनारा घडूं फुंकू लागे ।
चोखामेळय़ासंगे ढोरे ओढी ।।5।।नामयाची जनी सवे वेची शेणी ।धर्मा घरी पाणी वाहे झाडी ।।6।।
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित ।ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ।।7।।अर्जुनाचे रथी होय हा सारथी ।
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ।।8।।गौळीयांचे घरी अंगे गायी वळी ।द्वारपाळ बळी द्वारी झाला ।।9।।
येकोबाचे ऋण फेडी ऋषीकेषी ।आंबऋषीचे सोशी गर्भवास ।।10।।
मिराबाईसाठी घेतो विष प्याला ।
दामाजीचा जाला पाडीवार ।।11।।
घडी माती वाहे गोऱया कुंभाराची ।
हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ।।12।।
पुंडलिकासाठी अजूनी ति÷त ।
तुका म्हणे धन्य मात त्याची ।।13।।
क्रमशः







