व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून दोन हजारहून अधिकांना जीवदान : सावंतवाडीच्या देव्या सूर्याजी ग्रुपचा आदर्श : कोरोना काळातही 200 हून अधिक जणांना रक्तदान
प्रवीण मांजरेकर / सावंतवाडी:
जीवनात सुख, दुःख, यश, अपयश आशा-निराशा हे प्रसंग चालूच असतात. आपण जीवन जगताना संकटे ही येणारच. संकटाना टाळता येणे जरी शक्य नसले तरी दुःखांना टाळता येणे हे नक्कीच शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली की विचारांची ताकदही त्याप्रमाणात बदलत असते. आयुष्यातील खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो खरा. पण, भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. याच कर्तव्याला प्राधान्य देऊन सावंतवाडी येथील युवक दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात दोन हजारहून अधिक जणांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. कोरोना कालावधीतही त्यांनी 200 हून अधिक जणांना जीवदान दिले आहे. कोणताही उद्देश न ठेवता निःस्वार्थीपणे या ‘यंग ब्रिगेड’ ग्रुपची सेवा सुरू आहे.
आज विज्ञान एवढे पुढे सरसावले आहे की, आपल्याला आज विज्ञानामुळे बरेच चमत्कार पहायला मिळतात. परंतु, अजूनही मानवाला कृत्रिम रक्त तयार करण्यात यश आले नाही. रक्त कोणत्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. एका मानवाचे रक्तच दुसऱया मानवाचे प्राण वाचवू शकते. रक्तदान करणे हे माणुसकीचे खऱया अर्थाने कर्तव्य आहे. पण, बरेचजण भावनेच्या नादात गैरसमज करून घेतात. रक्तदानाने अशक्तपणा येईल, काहीतरी आजार होईल किंवा इतर गैरसमज करून घेऊन रक्तदान करायला घाबरतात. त्यामुळे रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा जाणवतो. किंवा रक्ताअभावी अनेकांना प्राण गमावण्याची वेळही येते. हीच समाजातील समस्या ओळखून सूर्याजी यांचा व्हॉट्सऍप ग्रुप कार्यरत आहे. या
ग्रुपचे 255 सदस्य असून रुग्णांना आवश्यक रक्तगटाची माहिती गुपवर आल्यानंतर त्या-त्या रक्तगटाचा युवक रक्तदानासाठी तयार होतो.
या ग्रुपचा प्रत्येक सदस्य वर्षातून किमान तीनवेळा रक्तदान करतो. केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर बांबोळी, कोल्हापूर, बेळगाव आदी भागात रक्तदानाची आवश्यकता असल्याचे माहिती मिळाल्यानंतर या ग्रुपचे सदस्य रुग्णापर्यंत पोहोचतात. लहान वयातच रक्तदाता ग्रुप तयार केल्यानंतर समाजकार्याची आवड अधिक निर्माण झाली. ग्रुपवर रक्ताचे मेसेज आल्यानंतर आपोआपच रक्तासाठी फोन, मेसेज यायचे. त्यातून हे काम वाढतच गेल्याचे सुर्याजी सांगतात.
बांबोळीतील ‘त्या’ घटनेमुळे रक्तदाता ग्रुपची स्थापना
ऐच्छीक रक्तदानाचे औचित्य साधून देव्या सूर्याजी यांना त्यांच्या या महान कार्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, साधारण चार वर्षापूर्वीची घटना…बांबोळीत रात्री-अपरात्री पेशंट घेऊन जाणे अनेकवेळा व्हायचे. एक दिवस वेळेत रक्त पोहोचू न शकल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा रुग्णालयाबाहेरील आक्रोश जिव्हारी लागला. याच घटनेच्या दुसऱया दिवशीपासून मी कार्यास सुरुवात केली. सदरची घटना मित्रांना सांगितली. मित्रांनाही संकल्पना आवडली आणि व्हॉटसऍपच्या माध्यमातून सुरू झाला रक्तदानाचा उपक्रम. सुरुवातील लहान असणारा ग्रुप बघता, बघता कधी 255 च्या घरात पोहोचला, हे कधीच कळले नाहा, असे सुर्याजी म्हणाले. जि. प. चे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांचीही यामागे प्रेरणा असल्याचे सुर्याजी म्हणाले.
स्वखर्चाने रक्तदान
कोरोना कालावधीतील सकाळ ‘रक्ताची तातडीची गरज आहे’ या मोबाईल कॉलनेच सुरू हेते. सावंतवाडी, ओरोस, बांबोळी, कोल्हापूर आदी विविध ठिकाणी ग्रुपचे सदस्य तातडीने पोहोचत आहेत. ज्यावेळी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासतो, त्यावेळी रक्तपेढीमधूनही आपल्याला फोन येतात. कोरोनाच्या काळात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये दोनवेळा रक्तदान शिबीर घेतले व ज्यावेळी दुर्मिळ रक्तगट रक्ताची आवश्यकता होती, तेव्हा रक्तदाता पाठवून रुग्णांचे जीव वाचवले. कोरोना काळात पडवे रुग्णालयात रक्ताची गरज होते, तेव्हा लॉकडाऊन काळात आम्ही स्वखर्चाने जाऊन रक्तदान शिबीर घेतले. या रक्तदाता ग्रुपच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा गरीब असलेल्या अनेक रुग्णांना आतापर्यंत ब्लड कार्ड देण्यात आली. या कार्डवर एक रक्तबॅग फ्री मिळते, असेही सूर्याजी म्हणाले.
कोरोना काळात अन्य कार्यही कोराना काळात रक्तदानाव्यतिरिक्त अन्य कार्यही या ग्रुपने केले आहे. गरीबांना धान्य वाटप, लॉकडाऊन काळात रिक्षा, गाडय़ा बंद असताना गंभीर रुग्णाला रुग्णालयापर्यंत सोडण्याचे काम केले. प्रशासनालाही पूर्ण सहकार्य केले. संपूर्ण सावंतवाडी शहरात मोफत जंतूनाशक फवारणी स्वतः ग्रुपने केली. मुक्या जनावरांनाही सलग दोन महिने खाद्य देण्याचे काम केले.









