ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधितांवर उपचारानंतर घरी सोडण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी दररोज बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचमी, मृत्यू संख्येची होत नसलेली फेरपडताळणी, कोरोना योद्धांना मदतीपासून वंचित रहावे लागत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
पुढे ते पत्रात म्हणतात की, 1 जुलै 2020 रोजी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून अतिशय मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे. मुंबईत 1 जून रोजी 2,01,507 चाचण्या झाल्या होत्या. ती संख्या 30 जून रोजी 3,33,752 इतकी झाली. याचा अर्थ जन महिन्यात मुंबईत 1,32,245 चाचण्या झाल्या आहेत. म्हणजे मुंबईत दररोज सरासरी 4,405 चाचण्या होत आहेत. यातील पुन्हा होणाऱ्या चाचण्यांची संख्या वजा केल्यास 4000 चाचण्या दररोज होत आहेत. या चाचण्यांपैकी 36,559 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण 28 टक्के आहे.
फडणवीस यांनी पत्रात पुढे म्हटलं की, मुंबईत आतापर्यंतच्या एकूण 4,556 मृत्युंपैकी जून महिन्यात 3,277 मृत्यू दर्शवण्यात आले आहेत. यातील काही मृत्यू पूर्वीचे असतील पण त्यामुळे मुंबईचा मृत्युदर काढणे हे अतिशय जिकरीचे काम बनले आहे. सांख्यिकी योग्य नसेल तर एकूणच प्रशासनाला कोरोनाविरुद्धची उपाययोजनांची दिशा आखणे अतिशय कठीण होणार आहे.
दररोज 200 च्या आसपास मृत्यू संख्या दाखवण्यात येते. त्यातील 70-80 मृत्यू गेल्या 48 तासांतील दाखवण्यात येतात आणि 120 च्या आसपास पूर्वीचे दर्शवले जाता. मृत्युसंख्येची फेरपडताळणी प्रक्रिया लगेच पूर्ण केली पाहिजे.









