मुंबई \ ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टिकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं की, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच काल जळगावमधील मुक्ताईनगर येथे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. यावर बोलताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गाठीभेटी होत राहिल्या पाहिजेत , असे देखीस संजय राऊत म्हणाले. तसेच एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन-साडेतीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधा पक्षाचं काम आहे सत्ताधाऱ्यांवर टीका करणं. लोकशाहीमध्ये आपण त्यांची टीका स्वीकारली पाहिजे . त्यांनी काय टीका केली आहे हे मला माहिती नाही. पण त्यांनी या काळात, कोरोनाचं संकट, महागाई आणि इतर महाराष्ट्रातील प्रश्न आहेत, यावर लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विरोधा पक्षांनी महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे. निवडणुका होतील, त्यावेळी एकमेकांशी आम्ही लढत राहू, संघर्ष करु. लोक जो कौल देतील तो आम्ही स्वीकारु. देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं की, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. मी त्यांचं दुःख समजून घेतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधी पक्ष हळूहळू जमिनीवर येत आहेत हे चांगलेच आहे. राजकारणात कोणी शत्रू नसतो, ते मित्र आहेत आणि राहतील. काल ते खडसेंच्या घरी गेल्याचं पाहून मला चांगलं वाटलं. त्याआधी ते शरद पवारांच्या घरी गेले. विरोधी पक्ष जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण लोकशाहीत संवाद असलाय हवा, महाराष्ट्रात ही परंपरा आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर स्वागत करायला पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना, तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात अशी टीका संजया राऊत यांनी यावेळी केली.
Previous Articleसीबीएसई १२ वी बोर्ड परीक्षा रद्द : कर्नाटक लवकरच द्वितीय पीयू परीक्षेबाबत घेणार निर्णय
Next Article बोरगाव पोलिसांची खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई








