नागपूर / ऑनलाईन टीम
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे अटक, परमबीर सिंग यांची उचलबांगडी आणि गृहमंत्र्यांवर झालेले आरोप. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर एसआरपीएफचे सशस्त्र जवान, शहर पोलीस दलाचे जवान आणि खासगी सुरक्षा रक्षक असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन देखील करण्यात आले. या प्रकराणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. ही सगळी स्थिती लक्षात घेऊनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवल्याची माहिती समोर आली आहे.
यासोबतच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर देखील सुरक्षा व्यवस्था वाढवल्याची माहिती समोर आली आहे.