माणसाच्या जगण्याला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा महत्त्वाच्या असल्या, तरी त्या मिळविण्यासाठी त्याला आपला स्वाभिमान, आपण माणूस म्हणून असल्याची अस्मिता गहाण ठेवावी लागत असेल, तर असले जगणे जगायचे कशाला असा प्रश्न उपस्थित होतो. मराठी दलित आत्मचरित्रातून हाच प्रश्न उपस्थित केला गेला. या आत्मचरित्रांपैकी मैलाचा दगड ठरलेले आत्मचरित्र म्हणजे ज्ये÷ लेखक माधव कोंडविलकर यांचे बहुचर्चित ठरलेले ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे आत्मचरित्र. कोंडविलकर यांचे शनिवारी निधन झाले आणि त्यांच्या रूपाने शोषित समाजाचे प्रत्ययकारी, प्रभावी आत्मप्रकटन करणारा लेखक मराठी साहित्याने गमावला. मराठी साहित्य 60 च्या दशकापर्यंत ‘गुडूगुडू’ असे होते असा आरोप दलित साहित्यकार मान्यवरांकडून होत आला आहे. अर्थात तो खराच आहे. साहित्य फक्त मनोरंजनाचा एक भाग होऊ शकत नाही, तर साहित्य हे समाजातील भेद निर्माण करणाऱया घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारेही असते. हे दलित आत्मचरित्रांनी दाखवून दिले. साठोत्तरी मराठी साहित्य हा प्रवाह सुरू झाला आणि तो आजतागायत थांबला नाही. कोंडविलकरांच्याच कोकणातील लेखिका उर्मिला पवार यांच्या गाजलेल्या ‘आयदान’ या सशक्त आत्मकथनापर्यंत आपल्याला हा प्रवास ठळकपणे नोंदविता येईल. कोंडविलकर खरंतर रत्नागिरी जिल्हय़ातील. त्याकाळी उर्वरित महाराष्ट्रात दलित समाज ज्या तडफेने आपल्या प्रश्नांना भिडत होता, तसा कोकणातील दलित समाज आपले प्रश्न घेऊन उभा नव्हता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळय़ाचा संघर्ष कोकणातच उभारला असला आणि कोकणातील दलितांचे खोतीचे प्रश्नही सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असले, तरी बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्माचा विचार इथे स्वीकारायला बराच काळ लागला. अशा काळात कोंडविलकर यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ सारखे चर्मकार समाजातील समूहाला जातीभेदाचे अनुभव प्र्रकट करणारे आत्मकथन लिहिले, ही महत्त्वाची गोष्ट म्हणायला हवी. दया पवार यांच्या ‘बलुतं’च्या पाठोपाठ आलेल्या या आत्मकथनाने मराठी साहित्यात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवून एक इतिहासच निर्माण केला. माधव कोंडविलकर हे शिक्षक होते. त्यानिमित्ताने वेगवेगळय़ा गावात त्यांची बदली होत होती. मात्र, त्यांच्या समोर मुलांना कसे शिकवावे हा प्रश्न नव्हता, तर मुलांना शिकविण्यासाठी ज्या शाळेत आपण जाऊ तिथे मुक्काम कसा करायचा? कारण देशाला स्वातंत्र्य मिळाले, माणसाच्या स्वातंत्र्यासाठी त्याच काळात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याने देशाच्या स्वातंत्र्याबरोबर गुलामाला तू गुलाम आहेस हे दाखवून देण्यासाठी चळवळी उभारल्या आणि माणसाचे स्वातंत्र्य, त्याचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, यासाठीही ते त्यावेळी कार्यरत राहिले. मात्र, स्वातंत्र्याला अनेक वर्षे झाली, तरी येथील जातीपातीच्या भेदाचा प्रश्न तसाच होता. त्या अनुभवाचे चटके कोंडविलकर यांना शिक्षक म्हणून बदली झाल्यावर प्रत्येक गावात बसत होते. ते सगळे अनुभव ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या आत्मचरित्रातून वाचताना आपल्यालाही आपण माणूस म्हणून असल्याची लाज वाटते आणि आपण कशाला भेदभाव मानणाऱया धर्मात जन्माला आलो, असे वाटत राहते. निव्वळ माणूस म्हणून जगणारा कोणीही माणूस हे आत्मचरित्र वाचून हादरून जातो आणि तो आतून बंड करून उठतो. एवढा प्रभाव विचारी माणसावर ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या आत्मचरित्राचा राहतो. यातूनच मराठी साहित्यात हे आत्मचरित्र किती मोलाचे आहे हे लक्षात येईल. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या आत्मकथनाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर अक्षरशः आपण हादरून जातो. एका फाटक्मया टोपलीत चपलाखाली गुलाबाचे फुल. मानवी व्यवस्थेने गुणवंत माणसाला कोणत्या स्थितीत जगवले आहे, याचे प्रतिकात्मक रूप म्हणजे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकाचे हे बोलके मुखपृ÷ होय. जातीची उतरंड भोगावी लागणाऱया अनेक समाजातील आजवर शेकडो लोकांनी आत्महत्या केली आणि एकूण समाजानेच त्यांना करायला लावली. कोंडविलकर यांनाही असा त्रास सहन करावा लागला परंतु ते कधी निराश झाले नाहीत. त्यांनी आपल्या आलेल्या जातीय समस्येवर मार्ग काढत धीराने तोंड दिले. त्यामुळेच ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे आत्मचरित्र विद्रोही असले, तरी आवाजी ठरले नाही. इतर आत्मचरित्रात आणि या आत्मचरित्रात नेमका हाच फरक आहे. कोंडविलकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्हय़ातील राजापूर तालुक्मयातील मौजे देवाचे गोठणे नावाच्या खेडय़ात झाला. त्याकाळी कोकणात खोत कुळवाडी आणि दलित यांच्यात सतत संघर्ष होता. यातून कष्टकऱयांचे शोषण केले जात होते. समाजात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतूनच माणूस घडत असतो आणि याला ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’मधील समाज अपवाद नव्हता. त्यामुळे देवाचे गोठणे येथील आणि त्या परिसरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतूनच ‘देवाचे गोठणे’ हे आत्मकथन आकारास आले आहे. एक सुशिक्षित तरुण आपल्या समाजातील एक चित्र धीटपणे मांडतो आहे, याचे कौतुक त्यावेळी अनेक मराठी साहित्यातील दिग्गजांना वाटले. यात पु. ल. देशपांडे, मधु मंगेश कर्णिक अशा लोकप्रिय लेखकांचा समावेश होता. हे आत्मकथन वाचून त्यावेळी कविवर्य शंकर वैद्य आणि ज्ये÷ समीक्षक सरोजिनी वैद्य या दाम्पत्यानेही आपल्या मुंबई येथील घरी कोंडविलकर यांना बोलावून त्यांची विचारपूस केली होती. अलीकडच्या काळात ते कोकणातील देवरुख येथील साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांच्या घरीच राहत होते. माणूस कोणत्याही जातीत जन्माला येऊ दे, तो वाईट कधीच नसतो. माणसाची वृत्ती वाईट असते. मग तो कोणत्याही जातीत जन्माला येऊ दे हेच कोंडविलकर यांनीही आपल्या सर्व लेखनातून दाखवून दिले. त्यांना विनम्र आदरांजली!
Next Article तासगावात 47 जणांना कोरोनाची बाधा.
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.