राज्यातली प्रार्थनामंदिरे भाविकांसाठी खुली झाली. मोठय़ा देवस्थानांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांना प्रवेश देण्यासाठी काही निर्बंध घातले. अर्थातच नियम पाळण्यापेक्षा मोडण्यात पुरुषार्थ मानणारे दीडशहाणे समाजात असतातच. त्यामुळे लोकांच्या मनात धाकधूक होती. अशा लोकांनी घरातून बाहेर न पडता आपापल्या देवांना साकडे घातले. ते ऐकून नारदमुनींनी तातडीने देवांची सभा भरवली. अध्यक्षस्थान विष्णूने स्वीकारले.
“पृथ्वीवर कोरोनाचा धुमाकूळ चालू आहे. तो थोडासा आटोक्मयात येतो न येतो तोच जनतेने सरकारवर दबाव आणून मंदिरे खुली करायला लावली आहेत. अशा वेळी आपण काय करायचं यावर विचार करण्यासाठी ही सभा आहे,’’ इतकं बोलून नारदमुनी बाजूला झाले.
“शंकर भगवान लयतत्त्वाचे प्रभारी मानले जातात. त्यांनी तृतीय नेत्र उघडल्यामुळे कोरोना आला आहे काय?’’ एका ग्रामसंरक्षक देवतेने नम्रपणे विचारलं.
“माझा याच्याशी काही संबंध नाही. मी तृतीय नेत्र उघडला असता तर एव्हाना पृथ्वीवर एकही मानव उरला नसता,’’ महादेवांनी खुलासा केला. “भाविकांनी पुन्हा आपल्या दर्शनासाठी गर्दी करून कोरोना वाढवला तर त्यांचं चमत्काराद्वारे रक्षण करता येईल का?’’ एका संतांनी विष्णूला प्रश्न केला.
“मी स्थितीतत्त्वाचा देव आहे. लोकांना एकगठ्ठा वाचवण्यासाठी सामूहिक चमत्कार केला तर मीच निर्माण केलेले पदार्थविज्ञानाचे नियम कोलमडून पडतील आणि विश्वात हाहाकार माजेल. तस्मात चमत्कार करणे उचित ठरणार नाही,’’ विष्णूने उत्तर दिलं.
“कोरोनाची साथ जोरात होती तेव्हा माझ्या भक्तांना वारीत भाग घेण्यासाठी काही नेत्यांनी चिथावणी दिली. मी वारकऱयांना सुबुद्धी दिली. यंदाची वारी झाली नाही. वारकऱयांचे प्राण वाचले. पण त्यांना चिथावणी देणाऱयांवर यमदेवतेने कारवाई करावी,’’ विठ्ठलाने मागणी केली. “वारकऱयांना चिथावणी देणाऱया पुढाऱयांना मी कोरोना घडवून आणला. त्यांच्या कपाळी लिहिलेले आयुष्य संपेतो प्राणहरण करणे शक्मय नव्हते. मात्र निधनानंतर ते इथे येतील तेव्हा त्यांना नरकात पाठवले जाईल,’’ यमराजाने खुलासा केला.
“माझा उत्सव चालू असताना मी भक्तांना पुनः पुन्हा सुबुद्धीचे डोस देत राहिलो. त्यामुळे थोडय़ा प्रमाणात गर्दी टळली आणि लोकांचे प्राण वाचले. आताही मी माझ्या आणि इतर सर्व देवांच्या भक्तांना गर्दी टाळण्याची सुबुद्धी देत राहीन. जे माझं ऐकणार नाहीत, त्यांचं नशीब त्यांच्यापाशी,’’ गणपतीबाप्पा बोलले. गणपतीबाप्पांचे अभिनंदन करून सभेचे कामकाज संपले.








