दारू विक्रेत्यांनाच पोलिसांसमोर केले हजर
ओटवणे /प्रतिनिधी-
देवसू गावातील अवैद्य दारू विक्री विरोधात पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त व आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी दारू विक्रेत्यांनाच लक्ष करीत त्यांना पोलिसांसमोर हजर केले. यावेळी जमावाच्या आक्रमक भूमिकेमुळे दारू विक्रेत्यांनी गावात दारू विक्री करणार नसल्याचे चक्क लिहून दिले. तर या दारू विक्रेत्यांनी गावात पुन्हा दारू विक्री केल्यास तडीपारची कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी बजावले.
देवसू गावातील अवैद्य दारू त्यामुळे ग्रामस्थांसह महिला त्रस्त झाल्या होत्या. याबाबत तालुका ते जिल्हा पातळीपर्यंत आवाज उठवूनही कारवाई होत नव्हती त्यामुळे या अवैद्य दारूबंदीसाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेत दारू विक्रेत्यांना बैठकीत बोलावले. तसेच पोलीस प्रशासनाला याची माहिती देताच सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील, सहाय्यक निरीक्षक डुमिंग डिसोजा, आंबोली पोलिस स्टेशनचे हवालदार दत्तात्रय देसाई तात्काळ देवसूत हजर झाले.
यावेळी ग्रामस्थांनी दारू विक्रेत्यांच्या तक्रारीचा पाढाच वाचला तसेच महिलांनीही दारूमुळे कुटुंबातील कलह व दारिद्र्य बाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व महिलांचा रुद्रावतार पाहून दारू विक्रेत्यांनी यापुढे गावात कुठल्या प्रकारची दारू विक्री करणार नाही असे लेखी लिहून दिले. तर पोलिसांनी या विक्रेत्यांना पुन्हा गावात दारूविक्री करताना आढळल्यास प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने तडिपारची कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली. मात्र यापुढे पुन्हा गावात दारू विक्री सूरु झाल्यास ग्रामस्थांच्या उद्रेकाला पोलिस प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा सज्जड इशारा ग्रामस्थांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिला. या वेळी देवसू, ओवळीये, पारपोली गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









