वार्ताहर/ ताम्हाने
मुदतठेवीची रक्कम परत न करणाऱया देवरुखातील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला जिल्हा ग्राहक मंचाने दणका देत रक्कम व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत़
देवरूखातील प्रणय वणकुंद्रे यांनी या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 5 लाख रूपयांची रक्कम परत मिळविण्यासाठी तक्रार अर्ज तक्रार अर्ज दाखल केला होत़ा याचा निकाल नुकताच लागला असून वणकुंद्रे यांना ही मुदतठेवीची रक्कम व्याजासह व झालेल्या त्रासाच्या भरपाईसह देण्यात यावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत. प्रणय वणकुंद्रे या तरुणाने आपल्या व्यवसायातून मिळणारी रक्कम ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित देवरूखमध्ये 3 सप्टेंबर 2016 मध्ये 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली होती. या ठेवीची मुदत 2 मार्च 2017 मध्ये संपणार होती. ही मुदत संपल्यानंतर वणकुंद्रे यांनी या पतसंस्थेकडे मुदतठेवीची रक्कम मिळावी, अशी मागणी 30 जुलै 2018 रोजी लेखी अर्जाव्दारे केली होती.
या अर्जाच्या प्रति जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी व सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालय, देवरुख यांनाही दिल्या होत्या. तक्रार अर्ज करूनही पतसंस्थेने कोणतेही लेखी उत्तर दिले नाही. तसेच रक्कम देण्यास तरतूदही केली नाही आणि रक्कम देण्यास टाळाटाळ केली. ही रक्कम देण्याचे जाणीपूर्वक टाळले जात असल्याचे प्रणय वणकुंद्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्याला ही रक्कम व्यवसायासाठी आवश्यक असल्याने कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग स्वीकारला. कायदेशीर मार्ग स्वीकारत ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी यांच्याकडे 21 जानेवारी 2019 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. दिलेल्या तक्रारीत आपल्या ठेवीची रक्कम व्याजासह व झालेल्या मानसिक शारीरिक तसेच व्यवसायातील आर्थिक नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये मिळावे, असे म्हटले होते. या तक्रारीवर गेली 2 वर्ष युक्तीवाद सुरूच होता. मात्र तक्रारदार यांनी दिलेल्या भक्कम पुराव्यामुळे वणकुंद्रे यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
तक्रार निवारण आयोगाने या निकालात दिलेल्या आदेशात तक्रारदार वणकुंद्रे यांच्या ठेवीची रक्कम 45 दिवसात 6 टक्के व्याजदराने व्याजासह देण्यात यावी. तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटीही 15 हजार रुपये देण्यात यावेत, असे म्हटले आहे. 45 दिवसांत 5 लाख 9 हजार 863 रुपये एवढय़ा देय रक्कमेची पूर्तता पतसंस्थेने न केल्यास ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे पतसंस्थेच्या विरुद्ध दाद मागता येणार आहे, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी यांनी हा आदेश दिला आहे. या कामी तक्रारदार वणकुंद्रे यांची बाजू वकील अभिजित कदम यांनी मांडली.
पतसंस्थेच्या निर्णयावर अन्य ठेवीदारांचे भवितव्य अवलंबून
गेल्या काही वर्षापूर्वी ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था देवरुखमधील अफरातफर उजेडात आली आणि या आर्थिक घोटाळ्य़ाबद्दल शहरात खळबळ उडाली होती. यामुळे ठेवीदारामध्येही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काहींनी ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती. मात्र या दरम्यान प्रणय वणकुंद्रे यांनी आपल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर आपली रक्कम मिळावी, अशी रास्त मागणी केली होती. मात्र त्यांना त्यांची ठेव सहजपणे मिळू न शकल्यानेच आयोगाकडे तक्रार केली. आता वणकुंद्रेंना ठेवीची रक्कम कधी मिळणार आणि पतसंस्था या बाबत काय निर्णय घेणार, याकडे देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या निर्णयामुळे अन्य ठेवीदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.