विशेष प्रतिनिधी/ देवरुख
देवरुख-रत्नागिरी मार्गावर बावनदी ते पांगरी दरम्यान मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक सुमारे 2 तास ठप्प होती.
दुपारी डोंगराकडील बाजूने एक मोठे झाड मातीसह खाली आले. हे झाड थेट रस्त्यावर कोसळले. ज्यावेळी हा प्रकार घडला त्याच्या काही क्षण आधी एक गाडी इथून निघून गेल्याने अनर्थ टळला. झाड रस्त्यात असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. देवरुखकडून रत्नागिरीकडे जाणाऱया गाडय़ाना याचा मोठा फटका बसला. यात एस टी बसफेरीही अडकून पडल्या. मात्र रत्नागिरीकडून देवरुखला निघालेल्या चालकांनी वांद्री-ताम्हाने-देवरुख या पर्यायी मार्गाचा अवलंब केल्याने एका बाजुने वाहने फार ताटकळली नाहीत.
घटनेची माहिती मिळाल्यावर बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्या आधीच स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांनी झाड बाजूला करण्यास सुरुवात केली. सुमारे 2 तासांनंतर या भागातून छोटी वाहने ये जा करायला लागली. संध्याकाळी उशिरापर्यंत संपूर्ण झाड बाजुला करण्याचे काम सुरु होते.









