देवराष्ट्रे/प्रतिनिधी
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला दुचाकी, चारचाकी खरेदी करणे परवडणारे नाही. या महागाईला कंटाळून देवराष्ट्रेतील एका अशिक्षित लोहार समाजातील तरूणाने दुचाकी व चारचाकीच्या टाकाऊ वस्तूंपासून अफलातून चारचाकी गाडी तयार केली आहे. त्यानी हे काम दोन महिन्यात पूर्ण केले असून या गाडीला जुगाड जिप्सी असे नाव दिले आहे.
देवराष्ट्रे ता. कडेगांव या गावातील दत्तात्रय लोहार या तरूणाने आपल्या कौशल्याने व कष्टाने टाकाऊ वस्तूंपासून लहानशी चारचाकी तयार केली आहे. या गाडीचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे. दत्तात्रय लोहार यांचे छोटेसे फॅब्रिकेशनचे दुकान व थोडीसी शेती आहे परंतू ते आपल्या फॅब्रिकेशनच्या कौशल्याने परिसरात प्रसिद्ध आहेत. सध्या सर्वानाच आपल्याकडे चार चाकी गाडी असावी असे वाटते. तसे दत्तात्रय लोहार यांना ही वाटत होते परंतू आपली परिस्थितीत आणि आपल्या कुटुंबाची आपल्यावर असणारी जबाबदारी यासर्व व्यापातून आपल्याला चार चाकी गाडी घेणे शक्य नसल्याचे त्यांना वाटले परंतू आपण या परिस्थितीपुढे न झुकता स्वतः गाडी तयार करण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी सुरुवात केली.
यासाठी त्यांनी आपल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात भंगारात पडलेल्या दुकाची गाडीचे इंजिन व जीप या गाडीचे बोनेट, रिक्षाची चाके अशी भन्नाट जुळवाजुळव करून त्यांनी टुमकदार छोटी चार चाकी गाडी तयार केली आहे ही गाडी आकाराने नॅनो गाडीपेक्षा लहान असून ही गाडी चाळीस ते पंचेचाळीस एवढे मारले देते तर ताशी पन्नास कि.मी. वेगाने धावते आहे यामधून एकावेळेस चार माणसे बसून प्रवास करू शकतात ही गाडी बनवण्यासाठी त्यांना सुमारे साठ हजार इतका खर्च आला आहे. गाडी सुरू करण्यासाठी त्यांनी स्टाटरचा वापर न करता दुचाकी प्रमाणे किकचा वापर केला आहे. शिवाय याचे स्टेअरिंग इतर गाडीप्रमाणे उजव्या बाजूला न करता डाव्या बाजूस केले आहे अशी ही अफलातून गाडी तयार करण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे.
दत्तात्रय लोहा यांनी तयार केलेली अशी ही अफलातून गाडी आज रस्त्यावरून फिरत आहे. ही गाडी बघून प्रत्येक जण अवाक होत आहे. परंतू दत्तात्रय लोहार यांनी कोणतेही पदवी घेतलेली नाही. त्यांनी दाखवलेले कौशल्य एखाद्या सुशिक्षित व्यक्तीलाही लाजवेल असे आहे. यामधून त्यांनी दाखवून दिले आहे की प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. तुमची परस्थिती कितीही बिकट असली तरी तुमच्या कौशल्याने तुम्ही तुमचे ध्येय साधू शकता. आज या गाडीमुळे दत्तात्रय लोहार परिसरात परिचयाचे झाले आहेत.









