स्पर्म व्हेलच्या उलटीला म्हटले जाते ‘तरंगते सोने’ : भारतात व्यापारावर बंदी
मुंबईत दोन दिवसांपूर्वी फसला : खरेदी-विक्रीचा प्रकार
महेंद्र पराडकर / मालवण:
व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्री बेकायदेशीर असताना मुंबईत व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर देवमाशाच्या उलटीचा विषय सध्या किनारपट्टीवर विशेष चर्चेत आला आहे. देवमाशाच्या उलटीला मिळणारा सोन्याचा भाव ऐकून सारेच अचंबित झाले आहेत. किनाऱयावर फेरफटका मारताना जर आपल्याला हा दगडासारखा उलटीयुक्त शुष्क पदार्थ मिळाला, तर आपणही एका क्षणात मालामाल होऊ, असा स्वप्नवत विचारही काहींच्या मनात घर करत आहे. पण भारतात देवमाशाच्या उलटीच्या व्यापारावर बंदी आहे. उलटीपासून तयार झालेला शुष्क पदार्थ खूप किमती असल्याने बऱयाचदा खरेदीदारांची फसवणूकसुद्धा केली जाते.
व्हेल अर्थात देवमाशाच्या उलटीला अंबरग्रीस किंवा ऍमबिग्रीस संबोधले जाते आणि तो एक शुष्क पदार्थ आहे. जो केवळ ‘स्पर्म व्हेल’ प्रजातीतील व्हेलच्या पाचन तंत्रामध्ये आढळतो. सागरी शास्त्रज्ञांच्या मते स्पर्म व्हेलने स्क्विड (म्हाकूल) आणि ऑक्टोपसचे प्रचंड प्रमाणात सेवन केल्यानंतर जेव्हा त्याचे अपचन होते, तेव्हा उलटी तयार होते. या पदार्थात दुर्मीळ घटक असतात. अंबरग्रीस हे अल्कोहोल, क्लोरोफॉर्म, इथर आणि काही अस्थिर तेलामध्ये विद्रव्य आहे. म्हणून सामान्यत: कस्तुरीसारख्या परफ्युम आणि सुगंधाच्या निर्मितीमध्ये स्थिरकारी घटक म्हणून वापरला जातो. त्यामुळे सुगंधी द्रव्ये जास्त काळ सुगंध देतात. अंबरग्रीसला समुद्राचा तरंगता सोन्याचा खजिना म्हणतात. हे अत्यंत मौल्यवान आहे. ते सोन्याच्या किंमतीसारखे मौल्यवान असते. 1 ग्रॅमला 2750 रुपये म्हणजे 27 लाख 50 हजार रुपये एक किलोला, असा त्याला जवळपास भाव आहे. कारण ते सुगंधी द्रव्यांमध्ये सुगंध निर्धारण करणारा किंवा स्थिरक घटक म्हणून अत्यंत उपयोगाचे आहे. जगातील काही देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्री होते. मात्र, भारतात याच्या वापरावर बंदी आहे. अंबरग्रीस कडक असते. समुद्रात बराच कालावधी तरंगत राहिल्याने त्यावर मेणबत्तीसारखा चिकटपणा असतो. त्याला गोड सुगंध असतो. ओलसर जंगलातील भिजलेल्या मातीची आठवण करून देणारा मोहक गंध असतो. ऍमब्रिग्रीस समुद्रात खूप कालावधीसाठी तरंगत राहिल्यास गंध कमी प्रमाणात येतो. सर्वसाधारणपणे एम्बरब्रीसच्या फिकट रंगाच्या तुकडय़ांमध्ये सूक्ष्म, आनंददायी सुगंध असतो.
बऱयाचदा केली जाते फसवणूक
स्पर्म व्हेल उलटीच्या नावाखाली बऱयाचदा फसवणूकही केली जाते. खरेदीदारांचे उलटीविषयीचे अज्ञान त्याला बऱयाचदा कारणीभूत असते. बऱयाच प्रकरणांमध्ये अंबरग्रीस पदार्थ तयार करणारे स्पर्म व्हेल अंबरग्रीस मिळविण्यासाठी मारले जातात. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अंबरग्रीस खरेदी आणि विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे भारतातील किनाऱयावर असा दगड सापडल्यास तो वन विभागाच्या ताब्यात द्यावा लागतो.









