खूप मेहनत केल्यानंतर जेव्हा कौतुक होतं, त्यासाठी पुरस्कार मिळतो तेव्हा त्याला आनंदच होत असतो. एक बक्षीस मिळालं की त्यासोबत अजून एखादी संधी मिळावी असं वाटणेही स्वाभाविक आहे. तेव्हा मग आनंदाला आकाशही ठेंगणे होते ना. अशी डबल ट्रीट आपल्याही आयुष्यात मिळावी असं स्वप्न अभिनेता किरण गायकवाड याने कित्येक वर्षे डोळय़ात साठवलं होते. गेल्या आठवडय़ात त्याच्या दोन्ही स्वप्नांनी किरणची ओंजळ भरली आणि त्याला तर ही डबल ट्रिट मिळालीच पण त्याच्या चाहत्यांनाही त्याने खूश केलं. सर्वोत्कृष्ट खलनायक आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा या पुरस्कारावर किरणने नाव कोरलंच, पण त्याच पुरस्कार सोहळय़ाचे निवेदन करण्याची त्याची स्वप्नपूर्तीही झाली. किरणला मिळालेल्या ऍवार्डची तर चर्चा आहेच पण हे दोन्ही पुरस्कार हातात घेतलेल्या फोटोसह किरणने सोशल मीडियावर शेअर केलेली भावूक पोस्टही खूप व्हायरल झाली आहे. सातारा जिल्हय़ात घडलेल्या एका सत्यघटनेवर सध्या देवमाणूस या मालिकेने मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. डॉक्टरच्या सभ्य चेहऱयाआड लपलेल्या ++माणसाची व्यक्तीरेखा किरणने लिलया पेलली आहे. या मालिकेसाठीच किरणला ऍवार्ड मिळाले. किरणची नायक म्हणून ही पहिलीच मालिका आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे हेच त्याच्या या ऍवार्ड घेतल्यानंतरच्या पोस्टमधून दिसून येतं. किरणने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की या दिवसाची वाट मी गेल्या कित्येक वर्षापासून पाहत होतो. पुरस्कार सोहळे पाहताना मला नेहमी असं वाटायचं, की मी कधी त्या मंचावर पुरस्कार घेण्यासाठी जाणार… ऍवार्ड फंक्शनमध्ये सेलिब्रिटी डान्स करताना पाहून तर मी थिरकायचो. मी कधी करेन या मंचावर डान्स; हा उत्सुकतेचा प्रश्न कित्येकदा मी स्वतःला विचारायचो. पण त्यासाठी मेहनतही करावी लागणार ही खूणगाठ बांधून नाटकांच्या तालमी, प्रयोग करत राहिलो. देवमाणूस या मालिकेची संधी आली आणि माझ्या स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग मिळाला.
संकलन – अनुराधा कदम