‘कस्टम’ची देशातील दुसरी तरंगती जेटी
लोखंडी साहित्य गंजल्याने जेटीची दुरावस्था
कोटय़ावधीचा खर्च वाया जाण्याच्या मार्गावर
वार्ताहर / देवगड:
सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्यावतीने देवगड बंदरानजीक उभारण्यात आलेली देशातील दुसरी तरंगती जेटी अवघ्या दीड वर्षात मृत्यू शय्येवर गेली असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. तरंगत्या जेटीलाच आधाराची गरज निर्माण झाली आहे. या जेटीवरचा धोका लक्षात घेता तेथे न जाण्यासाठी ‘नो एन्ट्री’चा फलकही लावण्यात आला आहे. तसेच जेटीच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
देवगड बंदरानजीक या कामाचा शुभारंभ सीमा शुल्क-रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त आलोक कुमार सिंह यांच्या हस्ते 2 नोव्हेंबर 2018 रोजी करण्यात आले होता. या कामासाठी एक कोटी 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. अवघ्या दोन महिन्यांमध्ये जेटीचे काम पूर्ण करून 5 जानेवारी 2019 रोजी या जेटीचे उद्घाटन करण्यात आले. भारतामध्ये सीमा शुल्क विभागाच्यावतीने रत्नागिरी जिल्हय़ातील मिरकरवाडा बंदर व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील देवगड बंदरात ही तरंगती जेटी उभारण्यात आली. सिंधुदुर्गचा किनारा 161 कि. मी. लांबीचा असून सुमारे 16 हजार कि. मी. चा फिशिंग एरिया आहे. सीमा शुल्क विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने हे पहिले पाऊल उचलले होते. आतापर्यंत सीमा शुल्क विभाग हा समुद्राच्या बाहेर किनारपट्टी भागात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काम करीत होता. मात्र, आता समुद्रातही कस्टम विभाग देशाच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाला आहे. देवगड बंदरात होणाऱया तरंगत्या जेटीच्या ठिकाणी दोन अत्याधुनिक बोटी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. समुद्रात कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तसेच अनोळखी जहाज आढळल्यास त्याचा शोध व तपास यापुढे कस्टम विभाग घेणार आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षतेमध्ये वाढ होण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना आखल्या आहेत. देशातील ही तरंगती जेटी देवगड बंदरात उभारल्यामुळे येथील पर्यटनाच्यादृष्टीनेही महत्व प्राप्त झाले. मात्र, ही तरंगती जेटी वर्षभरातच मृत्यू शय्येवर असल्यासारखी अवस्था आहे.
वर्षभरातच जेटीचे लोखंडी साहित्य गंजले
या जेटीच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेले लोखंडी साहित्य पूर्णतः गंजलेले आहे. जेटीच्या दोन्ही बाजूने आधारासाठी असलेला एक लोखंडी खांब पूर्णतः गंजून मधून मोडला आहे. तर दुसरा खांबही नावापुरताच आधाराला असल्याचे दिसत आहे. जेटीच्या सुरुवातीच्या भागात मनुष्याला आधारासाठी असणारी रेलिंगही तुटली आहे. तसेच मुख्य जेटीचा भागही मध्यभागातच तुटून वेगळा झाला आहे. तसेच फायबर बॉक्सला आधार देण्यासाठी चारही बाजूने लोखंडी खांब असून हे सर्वच खांब गंजून गेले आहेत.
लोखंडाऐवजी अन्य साहित्य का नाही?
मुळात समुद्राचे पाणी खारट असून त्याचा परिणाम हा लोखंडावर लगेच होत असतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे लोखंडी साहित्य वापरणे गरजेचे होते. वर्षभरातच या जेटीचे लोखंडी साहित्य गंजून खराब होण्याचा प्रकार कामाचा दर्जा सांगत आहे. समुद्रातील खाऱया पाण्याचा विचार करून या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना लोखंडी खांबांऐवजी अन्य साहित्याचा वापर का करण्यात आला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जेटीला आधाराची गरज
या तरंगत्या जेटीवर खर्च करण्यात आलेला कोटी रूपयांचा खर्च वाया जाण्याच्या मार्गावर आहे. देशाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या जेटीलाच आता आधाराची गरज निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी दोरीच्या सहाय्याने तरंगत्या जेटीला बांधण्यात आले आहे. किनारी भागाच्या सुरक्षिततेसाठी पेंद्र सरकार निधी देत असताना स्थानिक यंत्रणेने महत्वपूर्ण प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, या कामाच्या योग्यतेसाठी कोणतीही उपाययोजना संबंधित यंत्रणेनी केली नाही. त्यामुळेच जेटीचे लोखंडी साहित्य गंजून जेटी मोडकळीस आली आहे. या जेटीचा उपयोग आता केवळ पर्यटकांना पाहण्यासाठीच होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.









