निसर्गप्रेमींकडून कासवांना जीवदान : तुटलेल्या जाळय़ांमुळे कासवांना गंभीर दुखापती
वार्ताहर / देवगड:
देवगड तालुक्याच्या किनारपट्टी भागात समुद्री कासवे मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दिवसभरात कुणकेश्वर, देवगड, तारामुंबरी किनारी एकूण चार कासवे जखमी अवस्थेत सापडली. समुद्रात टाकण्यात येणाऱया तुटलेल्या जाळय़ात ही कासवे सापडून ती वाहत किनाऱयावर येत आहेत. या सर्व कासवांच्या पायांना जाळय़ांमुळे गंभीर दुखापत झालेली असून पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही कासवे तारामुंबरी येथील भैरवनाथ महिला बचतगटाच्या मत्स्यपालन प्रकल्पात उपचार्थ ठेवण्यात आली आहेत. या मत्स्यपालन प्रकल्पात सद्यस्थितीत सहा कासवे उपचार्थ ठेवण्यात आली आहेत. या कासवांना जीवदान देण्यात तारामुंबरी येथील निसर्गप्रेमी युवकांचे योगदान फार मोठे आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊ वा. च्या सुमारास कुणकेश्वर मंदिरानजीक खडकाळ भागात जखमी अवस्थेत सापडलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाला तारामुंबरी येथील निसर्गप्रेमी युवकांनी जीवदान दिले. हे कासव साधारणतः साडेतीन फूट लांब व अडीच फूट रुंद होते. तर वजन सुमारे 70 ते 80 किलो होते. या जखमी कासवाची माहिती तेथील सागरी सुरक्षा रक्षक अमित बांदकर, अभिषेक कोयंडे व जीवरक्षक भुजबळ यांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर तारामुंबरी येथील निसर्ग मित्र गोविंद खवळे, अक्षय खवळे व दीपक खवळे यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी जात जखमी कासवाला खडकाळ भागातून सुखरुपपणे बाहेर काढले. या कासवाचा पुढील एक पाय तुटला होता. या कासवाला तारामुंबरी येथे आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी माधव घोगरे यांनी प्राथमिक उपचार केले. या जखमी कासवाला पालघर डहाणू येथील कासवांच्या हॉस्पिटलमध्ये कृत्रिम पाय रोपण करण्यासाठी तेथील लक्ष्मण तारी हे प्रयत्नशील आहेत. यावेळी तारामुंबरी भैरवनाथ बचतगटाच्या गटप्रमुख सौ. प्रियांका तारी, प्रियांका खवळे, हितेश खवळे,ज्ञानेश्वर सारंग, नाना पराडकर, ओमकार तारी, मयुरेश तारी आदी उपस्थित होते.
जाळय़ात अडकलेल्या कासवाला जीवदान
यादरम्यान सकाळी 11 वा. च्या सुमारास देवगड बीचवर ऑलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव जाळय़ामध्ये जखमी अवस्थेत सापडले. हे कासव साधारण तीन फूट लांब व अडीच फूट रुंदीचे होते. तर वजन सुमारे 50 ते 60 किलो होते. या कासवाला महेश सागवेकर, अमोल तेली, पप्पू कदम (सर्पमित्र), अवी खडपकर, अमित सकपाळ, नीलेश सावंत, यशवंत भोवर आदींनी जाळय़ांतून सुखरुप सोडविले. हा कासवाचादेखील पुढील पाय सुमारे 90 टक्के कापला होता. तर मागील एक पाय कातरला होता. या कासवावरही तारामुंबरी येथील मत्स्यपालन प्रकल्पस्थळी डॉ. घोगरे व त्यांचे सहाय्यक स्वप्नील परब यांनी उपचार केले.
तारामुंबरी बीचवर सापडली दोन कासवे
याचदिवशी सायंकाळी पाच वा. च्या सुमारास तारामुंबरी बीचवर जाळय़ात अडकलेली व जखमी अवस्थेत ऑलिव्ह रिडले जातीची दोन कासवे तेथील ग्रामस्थ श्री. हरम यांनी दिसून आली. याची माहिती निसर्गप्रेमी हितेश खवळे, अक्षय खवळे, ज्ञानेश्वर सारंग, दीपक खवळे, लक्ष्मण तारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जात दोन्ही कासवांना जाळय़ातून सोडविले. यातील एका कासवाचा पुढचा एक पाय नव्हता व मागील एक पाय 70 टक्के कापला होता. तर दुसऱया कासवाला पुढचा पाय कातरलेला होता व मागचा पाय अर्धा कट झालेला होता. या कासवांवरही डॉ. घोगरे यांनी उपचार केले. ही दोन्ही कासवे सव्वा दोन फूट लांब व पावणेदोन फूट रुंदीची असून साधारणतः 40 किलो वजनाची आहेत.
मुख्याधिकाऱयांची तारामुंबरी प्रकल्पाला भेट
दरम्यान, देवगड- जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी तारामुंबरी येथील भैरवनाथ बचतगटाच्या प्रकल्पास भेट दिली व कासवांवर सुरू असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी नगरपंचायतीच्या माध्यमातून कासव संवर्धन, तसेच अन्य वन्य प्राणी संवर्धन व संरक्षणासाठी जैवविविधता संरक्षण निधी न. पं. ने मंजूर करावा, अशी मागणी तारी यांनी यावेळी केली.









