आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचा भाव :
तारामुंबरी किनाऱयावर आढळली उलटीः
मच्छीमाराचा प्रामाणिकपणा :
वनविभागाच्या दिली ताब्यात
प्रतिनिधी / देवगड:
देवगड तारामुंबरी येथील स्मशानभूमीनजीकच्या समुद्र किनाऱयावर रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुमारे पाच किलो वजनाची कोटय़वधी रुपये किंमतीची देवमाशाची (व्हेल) उलटी येथील मच्छीमार उमाकांत उर्फ कांतू विठ्ठल कुबल (रा. शिवनगर) यांना आढळली. त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाच्या अधिकाऱयांनी रविवारी दुपारी देवगड येथे ही उलटी ताब्यात घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे. तसेच या उलटीची मोठय़ा प्रमाणात तस्करीही होते. असे असताना कुबल यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
देवगड-शिवनगर येथे राहत असलेले उमाकांत कुबल हे रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी तारामुंबरी समुद्रकिनारी गेले असता त्यांना स्मशानभूमीनजीकच्या किनाऱयावर एक विशिष्ट पदार्थ आढळला. या पदार्थ कुत्रे खात होते. म्हणून त्यांनी त्या कुत्र्यांना पिटाळून तो पदार्थ जवळून पाहिला. तो पदार्थ चिकट स्वरुपाचा असल्याचे दिसून आला. अशा प्रकारचा पदार्थ त्यांनी
प्रथमच किनाऱयावर पाहिला होता. त्यामुळे त्या पदार्थाचे फोटो काढून त्यांनी त्यांचे मित्र जे मुंबई येथे मत्स्य संशोधन संस्थेत काम करतात त्या स्वप्नील तांडेल यांना व्हॉट्सऍपवर पाठविले. तांडेल यांनी फोटो पाहिल्यानंतर तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे कुबल यांना सांगितले. या उलटीला कोटय़वधीची किंमत आहे. या उलटीची तस्करी केली जाते. त्यामुळे याची माहिती वनविभागाला द्या, अशीही सूचना दिली. त्यानुसार तांडेल यांनीच कणकवली वनविभागाला याची माहिती देऊन कुबल यांचा संपर्क क्रमांक दिला. कुबल यांनी तो पदार्थ एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये भरून घरी आणला.
वन अधिकारी तात्काळ देवगडमध्ये
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी तात्काळ कणकवली वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, ठाकुरवाडी वनरक्षक रानबा बिक्कड, कणकवली वनरक्षक अनिल राख, लिपीक संतोष आंबेरकर हे कुबल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर वनविभागाने स्थानिक नगरसेवक बापू जुवाटकर, पोलीस पाटील तन्वी खवळे यांच्यासमक्ष या पदार्थाचा पंचनामा केला.
देवगड किनारपट्टीचे महत्व वाढले
दरम्यान, ठाणे वनविभागाने 12 जुलै रोजी केलेल्या दोन ठिकाणच्या कारवाईत 26 किलो वजनाची सुमारे 26 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. तसेच या कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. व्हेल माशाच्या उलटीची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याने वनविभागाकडून देशभरात विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील देवगडसारख्या समुद्रकिनारी सापडलेल्या या व्हेल माशाच्या उलटीमुळे देवगडबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या किनारपट्टीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
‘उलटी’चा सुगंधी द्रव्ये बनविण्यासाठी वापर
व्हेल अर्थात देवमाशाच्या उलटीला अंबरग्रीस किंवा ऍमबिग्रीस संबोधले जाते आणि तो एक शुष्क पदार्थ आहे. जो केवळ ‘स्पर्म व्हेल’ प्रजातीतील व्हेलच्या पाचन तंत्रामध्ये आढळतो. सागरी शास्त्रज्ञांच्या मते स्पर्म व्हेलने स्क्विड (म्हाकूल) आणि ऑक्टोपसचे प्रचंड प्रमाणात सेवन केल्यानंतर जेव्हा त्याचे अपचन होते, तेव्हा उलटी तयार होते. या पदार्थात दुर्मीळ घटक असतात. अंबरग्रीस हे अल्कोहोल, क्लोरोफॉर्म, इथर आणि काही अस्थिर तेलामध्ये विद्रव्य आहे. म्हणून सामान्यत: कस्तुरीसारख्या परफ्युम आणि सुगंधाच्या निर्मितीमध्ये स्थिरकारी घटक म्हणून वापरला जातो. त्यामुळे सुगंधी द्रव्ये जास्त काळ सुगंध देतात.
उलटीच्या वापरावर भारतात बंदी
अंबरग्रीसला समुद्राचा तरंगता सोन्याचा खजिना म्हणतात. हे अत्यंत मौल्यवान आहे. ते सोन्याच्या किंमतीसारखे मौल्यवान असते. एका ग्रॅमला 2750 रुपये म्हणजे 27 लाख 50 हजार रुपये एक किलोला, असा त्याला भाव आहे. कारण ते सुगंधी द्रव्यांमध्ये सुगंध निर्धारण करणारा किंवा स्थिरक घटक म्हणून अत्यंत उपयोगाचे आहे. जगातील काही देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्री होते. मात्र, भारतात याच्या वापरावर बंदी आहे. अंबरग्रीस कडक असते. समुद्रात बराच कालावधी तरंगत राहिल्याने त्यावर मेणबत्तीसारखा चिकटपणा असतो. त्याला गोड सुगंध असतो. ऍमब्रिग्रीस समुद्रात खूप कालावधीसाठी तरंगत राहिल्यास गंध कमी प्रमाणात येतो. सर्वसाधारणपणे अंबरग्रीसच्या फिकट रंगाच्या तुकडय़ांमध्ये सूक्ष्म, आनंददायी सुगंध असतो.
व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोटय़वधीची किंमत असल्याने या उलटीची तस्करीही केली जाते. मात्र, मच्छीमार उमाकांत कुबल यांनी या उलटीबाबतची माहिती वनविभागाला देऊन शासनाला सहकार्य केले आहे. याबद्दल त्यांचे वनविभागाकडून आपण कौतुक करत असल्याचे घुणकीकर यांनी सांगितले.
तपासणीसाठी पाठविणार वनविभागाने या पदार्थाचे वजन केले असता हा पदार्थ सुमारे पाच किलो वजनाचा होता. याबाबत माहिती देताना वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी सांगितले, हा पदार्थ आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीसाठी पाठविणार आहोत.
प्रथमदर्शनी हा पदार्थ व्हेल माशाच्या उलटीसारखा दिसत आहे. मात्र, याची शहानिशा करण्यासाठी या पदार्थाची तपासणी करण्यात येईल.









