प्रतिनिधी / देवगड
‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीपोटी सिंधुदुर्ग जिल्हय़ाला शासनाने 2 कोटी 61 लाख रूपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतील 51 लाख 85 हजार निधीचा पहिला टप्पा देवगड तालुक्यातील मच्छीमारांना वितरीत करण्यात आला. देवगड तहसील कार्यालयामार्फत लाभार्थी मच्छीमारांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र, अजूनही मालवण व वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमारांना अद्याप निधी वितरित केला नसल्याचे समजते.
‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळाने कोकणातील किनापट्टीवरील मच्छीमारांच्या बोटींचे व मासेमारी जाळय़ांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार शासनाने नुकसानीपोटी सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी 2 कोटी 61 लाखाचा निधी मंजूर केला. त्यात देवगड तालुक्याला 51 लाख 85 हजार, मालवण तालुक्याला 14 लाख 85 हजार तर वेंगुर्ले तालुक्याला 1 कोटी 94 लाख 30 हजाराचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी देवगड तालुक्याला नुकताच 51 लाख 85 हजाराच्या निधीचे वितरण करण्यात आले. लाभार्थी मच्छीमारांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात आला आहे.








